SIR मधून पाटील, पवार, जाधव, खान आडनाव असलेली सर्वाधिक नावे गायब, जिथे विजयाचं अंतर कमी तिथेच…
महाराष्ट्रातील एसआयआर अहवालानुसार, 2.07 कोटी मतदारांची नावे ड्राफ्ट यादीतून गायब आहेत, ज्यात पाटील, पवार, जाधव, खान यांसारख्या आडनावांची संख्या सर्वाधिक आहे. 190 विधानसभा मतदारसंघांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, विशेषतः जिथे विजयाचे अंतर कमी आहे. निवडणूक आयोगाने नाव वगळले नसून पडताळणी सुरू असल्याचे म्हटले आहे.

जयप्रकाश सिंह, टीव्ही9 भारतवर्ष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या एसआयआरबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात एसआयआरनंतर 2.07 कोटी मतदारांची नावे ड्राफ्ट व्होटर लिस्टमध्ये नाहीये. त्याचा परिणाम 190 विधानसभा मतदारसंघावर पडणार आहे. ज्या ठिकाणी विजयाचं अंतर कमी आहे, तिथल्या मतदारांची नावे एसआयआरमध्ये कापल्या गेली आहेत, असा दावा केला जात आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे ठरावीक आडनावांवर या यादीत फुली मारण्यात आली आहे.
या रिपोर्टमध्ये मुंबईतील कुलाबा विधानसभेच्या जागेचा उल्लेख आहे. या जागेवरील मतदारांची संख्या 2024च्या निवडणुकीतील एकूण मतदारांपेक्षा अधिक आहे. एसआयरमधून शेख, खान, पाटील, जाधव आणि पवार आडनाव असलेल्यांची नावे सर्वाधिक कापण्यात आली असल्याचं रिपोर्टमधून उघड झालं आहे. तसेच पुरुषांच्या तुलनेत महिलांची दुप्पट नावे या यादीतून हटवण्यात आल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
190 जागांवर…
रिपोर्टमधील माहितीनुसार, 190 जागांवर मृत्यूसह इतर कारणाने मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. त्यांची संख्या 2024 च्या निवडणुकीतील आमदाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त आहे. जे सापडले नाहीत किंवा जे आपल्या पत्त्यावर आढळले नाहीत अशा 95 जागांवरील मतदारांची संख्याही विजयाच्या फरकापेक्षा जास्त आहे, महाविकास आघाडीच्या जिंकलेल्या जागांवर 18.5 टक्के आणि महायुतीच्या जिंकलेल्या जागांवर 17.6 टक्के मतदारांची नावे ड्राफ्ट लिस्टमध्ये नाहीयेत.
या आडनावांवर फुली
रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातील शेख आडनाव असलेले 7.54 लाख, पाटील आडनाव असलेले 4.84 लाख, खान आडनाव असलेले 3.69 लाख, जाधव आडनाव असलेले 3.40 लाख आणि पवार आडनाव असलेले 2.75 लाख मतदारांची नावे ड्राफ्ट लिस्टमध्ये नाहीयेत.
रिपोर्टमधील सर्वात महत्त्वाचा दावा म्हणजे, ड्राफ्ट लिस्टमधून ज्या मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, त्यापैकी 83.2 टक्के लोक जिवंत आहेत. तर 46 टक्के लोक 40 वर्षाखालील आहेत. मुंबईत 34.7 टक्के आणि ठाणे जिल्ह्यात 35.4 टक्के मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील इतर भागातील 19.5 टक्के मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.
14.6 टक्के मुस्लिमांचा पत्ता कट
एसआयआरच्या यादीतून 14.6 टक्के मुस्लिम मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. राज्यातील एकूण मतदार यादीतील मुस्लिमांचं प्रमाण 11.8 टक्के आहे. मुंबई शहरातील प्रमाण 28/4 टक्के आहे आणि मुंबई उपनगरातील प्रमाण 24.1 टक्के आहे. मुस्लिम नावे असलेल्या मतदारांची नावे दुसऱ्या ठिकाणी असण्याची शक्यता अधिक आहे, इतर मतदारांच्या तुलनेत ही शक्यता 2.7 टक्के असावी, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तृतीय पंथीयांचे आकडेही धक्कादायक आहेत. 2024 मतदार यादीतील 6,101 थर्ड जेंडर मतदारांपैकी 3,250 म्हणजे 53.3 टक्के नावे लिस्टमध्ये नाहीयेत.
महिलांची सर्वाधिक नावे हटवली
18 ते 29 वयोगटातील जे मतदार मुंबईच्या बाहेर इतर ठिकाणी कायमस्वरुपी शिफ्ट झाले आहेत, त्यामध्ये 8 लाख 22 हजार 798 महिला आणि 3 लाख 79 हजार 991 पुरुष आहेत. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांची नावे 2.2 पट वगळण्यात आली आहेत. लग्नानंतर महिलांनी नवऱ्याच्या घरी जाणं, त्यांचा पत्ता बदलणं, नावांची डबल नोंदणी करणं आदी कारणांमुळे महिलांची नावे वगळल्या गेल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
पुणे आणि ठाण्यातील सर्वाधिक नावे…
जिल्हावार आकड्यांवर नजर टाकली तर पुण्यातील 28.7 लाख, ठाण्यातील 28.6 लाख, मुंबई उपनगरातील 26.6 लाख, नागपुरातील 14.4 लाख आणि नाशिकमधील 10.3 लाख मतदातारांची नावेच लिस्टमध्ये नाहीयेत.
सॉफ्टवेअरमध्ये गडबड?
कोलकात्यातील सबर इन्स्टिट्यूटने महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेवर सवाल उपस्थित केला आहे. संस्थेचे प्रमुख साबिर अहमद यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे. व्होटर लिस्ट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली गेली आहेत, असा आरोप साबिर अहमद यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने या मोहिमेची चौकशी करावी. व्होटर आयडीचा वापर अनेक सरकारी आणि प्रशासकीय कामासाठी होतो. अशावेळी व्होटर लिस्टमधून नाव हटवल्यास पासपोर्ट रिन्यू करने, डोमिसाइल सर्टिफिकेट, सरकारी योजना आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं साबिर अहमद यांनी म्हटलंय.
निवडणूक आयोग काय म्हणाले?
या आरोपांवर महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाकडून उत्तर आलं आहे. एसआआरची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. ड्राफ्ट व्होटर लिस्टमध्ये नाव नाही म्हणजे याचा अर्थ मतदारांचे नाव कायमस्वरुपी काढून टाकलं गेलं सं नाहीये. मतदारांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील 21 टक्के मतदारांचे नाव ड्राफ्ट लिस्टमध्ये नाहीये. त्यातील 16.8 टक्के मतदारांची नावे मृत्यू झाल्याने हटवण्यात आली आहेत.
मुंबई आणि ठाण्यात इतर शहरातून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नईसारख्या महानगरातून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे हटवण्यात आली आहे, त्यामागचं कारण हेच आहे. मुस्लिम मतदारांची नावेही ड्राफ्ट लिस्टमध्ये नाही. पण त्याचा धर्माशी काही संबंध नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
16 नोव्हेंबरला पुन्हा संधी
ज्या लोकांची नावे ड्राफ्ट व्होटर लिस्टमध्ये नाहीत आणि ज्यांना काही आक्षेप आहेत, ते लोक 16 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे आक्षेप नोंदवू शकतात. ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, ते गणना फॉर्म भरू शकतात. मतदार यादीत नाव टाकण्यासाठी दुसऱ्यांदा अर्ज करू शकतात, असंही आयोगाने म्हटलं आहे.