मनिष भानुशालीने दिल्लीत बोलवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली; सुनील पाटील यांची धक्कादायक माहिती

| Updated on: Nov 07, 2021 | 5:03 PM

पाच-सहा दिवसांपूर्वी मनिष आणि धवल भानुशाली यांनी मला दिल्लीत बोलावून घेतलं होतं. दिल्लीत गेल्यावर या दोघांनीही मला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. (manish bhanushali threaten me, says sunil patil)

मनिष भानुशालीने दिल्लीत बोलवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली; सुनील पाटील यांची धक्कादायक माहिती
sunil patil
Follow us on

मुंबई: पाच-सहा दिवसांपूर्वी मनिष आणि धवल भानुशाली यांनी मला दिल्लीत बोलावून घेतलं होतं. दिल्लीत गेल्यावर या दोघांनीही मला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा धक्कादायक आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळच वळण लागलं आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर सुनील पाटील पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत मी या प्रकरणाचा मास्टरमाइंड नाही, असं स्पष्ट सांगितलं. मी अहमदाबादमध्ये नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. अहमदाबादेत मी थांबलो होतो. पाच सहा दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशालीने मला दिल्लीला बोलावलं होतं. मी भाड्याची कार घेऊन दिल्लीला गेलो होतो. दिल्लीत गेल्यावर पहिल्या दिवशी मला धमकी दिली. मारहाण केली. इथून गेला तर मारून टाकू, आम्ही मोठ्या नेत्यांना भेटणार आहोत. तू यांना एक्सपोज कर, असं मला धमकावलं. त्यावर, काय एक्सपोज करू? जे सत्य आहे ते सांगा ना. मी कशाला कुणाला एक्सपोज करू, असं मी त्यांना सांगितलं, असं पाटील यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही

या प्रकरणात मला फसवलं गेलं. मी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी कधीच सह्याद्री अतिथीगृहात गेलो नाही. मी सह्याद्री अतिथीगृहात गेलो की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज काढून तपासा, असं आव्हानच त्यांनी दिलं. तसेच मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर 10 तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं.

ललितच्या पार्ट्यांमध्ये कधीच गेलो नाही

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते, शराब, कबाब असं तिथे घडत होतं, असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोज यांना सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच, असं ते म्हणाले.

ऋषिकेश देशमुखांना ओळखत नाही, वळसे-पाटलांना भेटलो नाही

आधी कंबोज यांनी ऋषिकेश देशमुख यांचं नाव घेतलं. ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध असल्याचं सांगितलं. पण मी ऋषी देशमुखला ओळखत नाही. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं. बनावट रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही, असं सांगतानाच मी जर बदल्यांचं रॅकेट चालवतोय तर माझ्याकडे किमान 100 कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास करा आणि नंतर रॅकेटची वार्ता करा, असं आव्हानच त्यांनी कंबोज यांना दिलं.

 

संबंधित बातम्या:

तो तेरा बेटा लंबा जायेगा… शाहरुख खानलाही घाबरवण्याचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार, ईडीची हायकोर्टात धाव, न्यायालयीन कोठडीला चॅलेंज

(manish bhanushali threaten me, says sunil patil)