Maratha Reservation : मुंबईत भगवं वादळ धडकणार; मराठा मोर्चाचा लाँगमार्चचा इशारा

आमच्या हक्काचं 16 टक्के आरक्षण ओबीसींकडे वर्ग करण्यात आलं आहे. तेच आरक्षण आम्ही मागत आहोत. कुणबी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मराठा समाज एक होतो हे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवू दिलं आहे.

Maratha Reservation : मुंबईत भगवं वादळ धडकणार; मराठा मोर्चाचा लाँगमार्चचा इशारा
maratha morcha
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2023 | 1:11 PM

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. उद्यापर्यंत आरक्षणाची घोषणा नाही झाल्यास मनोज जरांगे 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. आता याच मुद्द्यावरून मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. मराठा मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन थेट सरकारलाच आव्हान दिलं आहे. येत्या दोन दिवसात आरक्षणावर भूमिका मांडा. नाही तर आम्ही मुंबईत लाँगमार्च काढण्यात येईल, असा इशारा मराठा मोर्चाने दिला आहे. राज्यभरातून मराठा समाज मुंबईत धडकणार असल्याचंही आंदोलकांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेली मुदत उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. येत्या दोन दिवसात सरकारने आरक्षणावर भूमिका जाहीर करावी. नाही तर महाराष्ट्रातून लाँग मार्च निघेल आणि हा लाँगमार्च मुंबईला येऊन धडकेल. आमचा हा विराट लाँगमार्च सरकारला झेपणार नाही, असा इशाराच मराठा मोर्चाने दिला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मणी आहेत. आमचा छळ थांबवा. राज्यातील वातावरण कुणालाही पोषक नाही. आमचा अंत पाहू नका, असं कळकळीचं आवाहनही मराठा मोर्चाने केलं आहे.

आमच्या डोक्यातही नव्हतं

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी नव्हती. आमच्या डोक्यातही तो विचार आला नव्हता. राज्य सरकारनेच ते सांगितलं होतं, असा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला. तसेच कुणबी जात प्रमाणपत्राची याचिका कोर्टाने फेटाळलीय. सरकारने त्यावर खुलासा करावा, अशी मागणीही मराठा मोर्चाने केली आहे.

जरांगेंना पाठिंबा

मनोज जरांगे दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. गरीब मराठ्यांना 50 टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे. आम्ही मनोज जरांगेंच्या पाठी आहोत. समाजासाठी जरांगे लढत आहेत. मराठा म्हणून आमची नोंद आहे. त्यामुळे मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

टास्क फोर्स तयार करा

सत्ताधारी आणि विरोधकांनी आमच्यात फूट पाडू नये. 50 टक्क्याच्या आत आरक्षण द्या. इतर पर्यायही पाहा. क्युरेटिव्ह पिटीशनबाबत खुलासा करा. टास्क फोर्स तयार करा, असं सांगतानाच आमच्या आत्महत्या वाढाव्यात म्हणून वाट पाहत आहात का?येत्या दोन दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही तर लाँगमार्च काढू. हा लाँगमार्च सरकारला परवडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या

गेल्या 6 मे 2023 पासून मराठा वनवास यात्रेतून आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पायी चालत आहोत. 31 दिवस पायी चालत आहोत. आम्हाला ओबीसीतून 50 टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची मागणी आहे. आम्ही शरद पवार यांच्या घरावर खंजीर आंदोलन केलं तेव्हापासून आमची मागणी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.