कैलास लस्सी दुकानाला आग! खिडकीतून थरारक सुटका, स्टेशनला लागूनच आगीचे लोळ; व्हिडीओ व्हायरल

डोंबिवली स्टेशनजवळील कैलास लस्सी दुकानाला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट आणि ज्वाळा पसरल्याने एकच खळबळ उडाली. दुकानात अडकलेल्या कामगारांनी खिडकीतून बाहेर पडत थरारक सुटका करून घेतली. अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

कैलास लस्सी दुकानाला आग! खिडकीतून थरारक सुटका, स्टेशनला लागूनच आगीचे लोळ; व्हिडीओ व्हायरल
Dombivli
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 06, 2026 | 3:55 PM

पावसाने तीन दिवसांपासून दाणादाण उडवून दिलेली असतानाच डोंबिवलीत कैलास लस्सीच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग प्रचंड भयानक होती. आगीमुळे धुराचे काळेकुट्ट लोळरिसरात पसरले होते. आगीच्या ज्वाळांमुळे सर्वच हादरून गेले होते. या हॉटेलात काही कामगार अडकल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.

डोंबिवली स्टेशन परिसरातील प्रसिद्ध कैलास लस्सी दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक धुराचे लोट उसळले. आगीच्या ज्वाळा भडकल्या. त्यामुळे एकच आफरातफर माजली. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धावाधाव सुरू झाली. डोंबिवली स्टेशनला लागूनच पूर्वेला हे हॉटेल असल्याने एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे दुकानात काही कामगार अडकल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला. दुकानात अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुकानाच्या पाठीमागील खिडकीतून बाहेर पडत सुटका करून घेतली. हे दृश्य अत्यंत थरारक आणि जीवघेणं होतं.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून नागरिकही हादरून गेले आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली? याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

एमआयडीसी रस्ता जलमय

दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी फेज-1 जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी फेज-1 परिसर पूर्णपणे जलमय झाला असून प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. साचलेल्या पाण्यात लहान मुले आनंद लुटताना दिसत असली, तरी त्यातून अपघात आणि आरोग्याचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कल्याणमधील टाटा पॉवर परिसरातून खंबाळपाडा गार्डन सर्कलकडे जाणारा मार्गही जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Follow Us