अखेर शाळेत कांदे बटाटे न आणण्याचा निर्णय मागे, मनसेच्या खळखट्याकच्या इशाऱ्यानंतर शाळेची माघार
मीरा रोडमधील सेव्हन स्केअर शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्याबाबत केलेल्या आवाहनावरून वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी डब्यामध्ये कांदा, लसूण आणि बटाटा आणू नये, असं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी शाळेच्या परिसरात फलकही लावण्यात आला होता. मात्र, मनसेने इशारा दिल्यानंतर शाळेने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे

मीरा रोडमधील सेव्हन स्केअर शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्याबाबत केलेल्या आवाहनावरून वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी डब्यामध्ये कांदा, लसूण आणि बटाटा आणू नये, असं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी शाळेच्या परिसरात फलकही लावण्यात आला होता. मात्र, मनसेने इशारा दिल्यानंतर शाळेने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मीरा भाईंदरमधील व्हेज नॉनव्हेज वाद प्रचंड चर्चेत आहे. हा वाद आता विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. सध्या जैन धर्मिय नागरिकांचा पर्यूषण पर्वाचा काळ सुरु आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये कांदा लसूण बटाटा देऊ नका असा मेसेज पालकांना दिला होता. हा मेसेज मीरा भाईंदरमधील सेव्हन स्केअर शाळेने तयार केलेल्या पालकांच्या एका व्हाट्सअप ग्रुपमध्येही आला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
नरेंद्र मेहतांनी केलेलं आवाहन
विशेष म्हणजे ही शाळा भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबियांच्या मालकीची खासगी शाळा असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या प्रकरणात उडी घेतली. दरम्यान, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलं की, पर्यूषण हा पवित्र काळ असून, या काळात प्राण्यांची कत्तल होऊ नये, या भावनेतून पालकांना केवळ विनंती करण्यात आली असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलंय. ही कोणतीही सक्ती नसून फक्त आवाहन आहे. आम्ही आमच्या धार्मिक भावना जपण्याचं आवाहन केलं, यामध्ये कोणीही राजकारण करु नये, असं म्हटलं.
मनसेनं दिलेला आक्रमक इशारा
पण, मराठा एकीकरण समिती आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं या सर्व प्रकाराला तीव्र विरोध केला होता. विद्यार्थ्यानी काय खायचं आणि काय नाही हे ठरवणारी शाळा कोण? त्यांना कोणी अधिकार दिला असं म्हटलं. धार्मिक भावना जपण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र त्याचा परिणाम हा कोणाच्या वैयक्तिक आहारावर होता कामा नये असं मनसेनं म्हटलं होतं. हा सर्व प्रकार गंभीर असून मनसेकडून आक्रमक इशारा दिला गेला होता. त्यानंतर शाळेने संबंधित निर्णय मागे घेण्याचं जाहीर केलं आहे. त्याचसोबत शाळेतील फलकही काढला आहे.