राज ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, शिवतिर्थावर लागले बॅनर्स; बॅनर्सवर कुणाकुणाचा फोटो?

| Updated on: Jun 12, 2023 | 11:05 AM

येत्या 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने दादरच्या शिवतिर्थावर भलं मोठं बॅनर लावण्यात आलं आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असं ठळक अक्षरात लिहिलं आहे.

राज ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, शिवतिर्थावर लागले बॅनर्स; बॅनर्सवर कुणाकुणाचा फोटो?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघ निहाय मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. अनेक पक्षांनी राज्यात सत्ता आणण्यासाठी आपआपल्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. राज्यात सत्ता आणण्याचा संकल्पच सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. मनसेही त्याला अपवाद नाहीये. येत्या 14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दादरच्या शिवतिर्थ परिसरात मनसेने बॅनर्स लावले असून त्यावर भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे असं लिहिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

येत्या 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने दादरच्या शिवतिर्थावर भलं मोठं बॅनर लावण्यात आलं आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असं ठळक अक्षरात लिहिलं आहे. तसेच हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा, असा मजकूरही या बॅनर्सवर लिहिण्यात आला आहे. त्याशिवाय या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. त्यानंतर पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. शिवतिर्थावर हे फोटो लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत राज्याची सत्ता आणण्याच्या दृष्टीने मनसे कामाला लागणार असल्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांचं आवाहन

दरम्यान, राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. दर वर्षी 14 जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण ह्यावर्षीपासून माझा तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

वह्या आणि रोपं आणा

तुम्हाला अगदीच काही आणावसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे, असं आवाहन करतानाच 14 जून रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मी उपलब्ध असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.