‘सत्तेचा माज आला की…’, मनसे नेत्याची भाजपवर सडकून टीका

मनसे पक्ष मुंबई-गोवा महामार्गासाठी आक्रमक झालाय. मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्यांची देखील तोडफोड करण्यात आलीय. मनसेच्या या खळखट्याक आंदोलनावर भाजप मंत्र्याने टीका केली. त्यांच्या टीकेवरुन मनसे नेते गजानन काळे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

सत्तेचा माज आला की..., मनसे नेत्याची भाजपवर सडकून टीका
| Updated on: Aug 22, 2023 | 6:26 PM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन मनसे पक्ष आक्रमक झालाय. मनसेकडून मुंबई-गोवा महामार्ग तयार व्हावा यासाठी टोल नाक्यांची तोडफोड केली जातेय. तसेच ठिकठकाणी आंदोलनं केली जात आहेत. मनसेच्या आंदोलनावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी टीका केली. त्यांच्या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर सडकून टीका केलीय. “गेली 17 वर्ष रस्ता होत नाही, याची लाज वाटण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्यांना शहाणपणाच्या गोष्टी शिकवणाऱ्या मंत्री महोदय यांना काय बोलावे?”, असा सवाल गजानन काळे यांनी केलाय.

“रखडलेल्या आणि मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने जमेल तिथे सनदशीर मार्गाने आणि भगत सिंग यांच्या वाक्याप्रमाणे, उंचा सूनने वालो को धमाके की जरुरत होती है, अशा मनसे स्टाईलने आंदोलन केली आहेत. त्याचा धसका भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जास्तच घेतल्याचे दिसतंय. ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देण्याची मराठी संस्कृती आहे. संत तुकाराम त्यामुळेच म्हणतात, भले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी”

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे जी तोडफोड झाली त्याची नुकसान भरपाई आणि जबाबदारी आम्ही घेतो आणि मंत्री म्हणून ज्यांचे मृत्यू झाले त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घेणार का? द्या उत्तर”, असं खडेबोल गजानन काळे यांनी सुनावलं.

‘सत्तेचा माज आला की…’

“पहिले देश नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती या उक्तीच्या उलट आपल्या पक्षाचा आणि आपला प्रवास सुरू आहे म्हणूनच कल्याण डोंबिवलीमधले शहर अंतर्गत रस्ते ही आपल्याला खड्डे मुक्त करता आले नाहीत. जनतेप्रती संवेदना संपल्या आणि सत्तेचा माज आला की दुसऱ्यांना दोष देणे सोपे होते. सत्ता असो नसो निवडणूक असो नसो महाराष्ट्र सैनिकांचा हात हा कायम जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी उठला आहे. अनेक केसेस आणि तुरुंगवास झाला तरी हा महाराष्ट्र सैनिक जनतेच्या प्रश्नासाठी कायम रस्त्यावर उभा राहिला आहे”, असं गजानन काळे म्हणाले.

‘सत्तेचे इमले बांधलेल्यानी…’

“सत्तेचे इमले बांधलेल्यानी आमची बरोबरी करू नये. मोडतोड करून पक्ष फोडून आणि भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनाच पक्षात घेवून त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगणारे तुम्ही आणि तुमची नैतिकता केव्हाच गहाण टाकली आहे, याची जनतेलाही कल्पना आहे”, अशी टीका गजानन काळे यांनी केली.

‘आपल्या सरकारला जाग येत नसेल तर…’

“अनेकदा निवेदन, निषेध शांततेच्या मार्गाने अहिंसक मार्गाने उपोषणे करून अनेक संघटना, पक्ष, सेवाभावी संस्था इतकेच नव्हे तर पत्रकार संघटना यांनीही या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलने करूनही आपल्याला आणि आपल्या सरकारला जाग येत नसेल तर कोणती भाषा वापरायची तुम्हीच सांगा मंत्री महोदय?”, असा सवाल गजनान काळे यांनी केला.

“मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाच्या घरी जावून त्यांचे सांत्वन तरी करायची संवेदनशीलता आपण ठेवली आहे का? कुठे ती घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा देणारी राजकारणातली पिढी तर कुठे तोंडवर करुन निर्लज्जपणा दाखवून दुसऱ्यावर दोष टाकणारी आताची मंत्री महोदय यांची पिढी”, असा घणाघात गजानन काळे यांनी केला.

“एका झटक्यात आम्ही आज उद्याच आंदोलन मागे घेतो. डिसेंबर 2023 पर्यंत या मुंबई-गोवा महामार्गावर एकही अपघात होणार नाही आणि त्या अपघातात कोणाचा जीव जाणार नाही, याची जबाबदारी आपण आणि आपले सरकार घेणार का? याची शाश्वती द्या आम्ही आंदोलन मागे घेतो”, असं गजानन काळे म्हणाले.

‘हे उद्योग बंद करा’

“राज ठाकरे यांना भेटायला या आणि हा कबुलीनामा द्या. कधी आंदोलनजीवी तर कधी श्रेयजीवी म्हणून दुसऱ्याची हेटाळणी करण्यापेक्षा आपणही या आंदोलनातूनच आला आहात याची जाणीव असू द्या. फक्त पत्र काढून जनतेची दिशाभूल करायची आणि खोट्या आश्वासनांवर लोकांची बोळवण करायची हे उद्योग बंद करा आणि जनतेची खरी कामे करा”, असा शब्दांत गजानन काळे यांनी सुनावलं.

“खोटं फार दिवस चालत नाही. मंत्री महोदय आणि हो तुमच्या कैक घटकेच्या सत्तेला हा महाराष्ट्र सैनिकच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आणि प्रतिज्ञा आम्ही घेतो. कौन कहता हैं आसमान मे सुराख नही हो सकता , एक पत्थर तो तब्येत से ऊछालो यारो”, असा घणाघात गजानन काळे यांनी केला.