6,500 कंत्राटी कामगारांच्या हक्काचे 90 कोटी द्या, अन्यथा कामबंद आंदोलन करु : मनसे

| Updated on: Jan 21, 2020 | 4:27 PM

कंत्राटी कामगारांना त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर येत्या 27 जानेवारीला एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी दिला आहे.

6,500 कंत्राटी कामगारांच्या हक्काचे 90 कोटी द्या, अन्यथा कामबंद आंदोलन करु : मनसे
Follow us on

नवी मुंबई : “नवी मुंबई महापालिकेतील 6,500 कंत्राटी कामगारांच्या 14 महिन्यांच्या किमान वेतनातील फरकाचे एकूण 90 कोटी रुपयांची थकबाकी द्या, अन्यथा कामबंद आंदोलन करु”, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आज बेलापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

महापालिकेतील 6,500 कंत्राटी कामगारांच्या 14 महिन्यांच्या किमान वेतनातील फरक एकूण 90 कोटी रुपयांचा असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आला नाही. दरम्यान, यासंदर्भात मनसेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती.

“कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न केले जात आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण केल्यानंतरही सत्ताधारी असलेल्या भाजपकडून जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीत ३ वेळा मंजूर करण्यात आलेला नाही. सत्ताधारी असलेल्या नाईक कुटुंबीयांनी कंत्राटी कामगारांचे संपूर्ण श्रेय घ्यावे. परंतु, कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे द्यावेत”, अशी विनंती संदीप देशपांडे यांनी यावेळी केली.

कंत्राटी कामगारांना त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर येत्या 27 जानेवारीला एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या एकदिवसीय कामबंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली.

कंत्राटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन समस्त नवी मुंबईकरांनी info@nmmconline.com या ईमेल आयडीवर जास्तीत जास्त मेल करून कंत्राटी कामगारांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, उपस्थित होते.