Mansoon Alert : आनंदवार्ता, पाऊस लवकरच भेटीला, आता कुठे ठोकला मुक्काम, केरळमध्ये कधी टाकणार राहुटी

Weather Update Mansoon Alert : आनंदवार्ता ऐकली का? पावसाने सांगावा धाडला आहे. सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहेत. तर काही परिसरावर काळ्या ढगांनी घुंगट घातले आहे. पण मान्सून यंदा लवकर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Mansoon Alert : आनंदवार्ता, पाऊस लवकरच भेटीला, आता कुठे ठोकला मुक्काम, केरळमध्ये कधी टाकणार राहुटी
सर आली धावून
Image Credit source: गुगल
| Updated on: May 13, 2025 | 1:35 PM

देशात लवकरच मान्सून धडक देणार आहे. केरळ मार्गाने महाराष्ट्रात मान्सूनची आनंददायी एंट्री होईल. मे महिन्यात होरपळून निघाल्यानंतर अबालवृद्धांसह सर्वांनाच पावसाची ओढ लागते. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यावर आभाळमाया आहे. त्यापूर्वी सूर्य कोपला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांना धो धो धुतले. तर आज ही काळ्या ढगांनी आभाळ भरून गेले आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा कमी झाल्या आहेत. तापमानात घट झाली आहे. आता कुठे आहे मान्सून? केरळमध्ये कधी टाकणार राहुटी?

हवामान विभागाचा अंदाज काय?

यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजीच दाखल होणार आहे. सर्वसाधारणपणे 1 जूनपासून मान्सून सक्रिय होतो. पण यंदा नेहमीच्या तुलनेत मान्सून पाच दिवस अगोदरच तळ ठोकणार आहे. त्याचे आगमन लांबणार नाही तर तो वेळेआधी प्राणी, निसर्गाला सुखावणार आहे.

मान्सूनचा प्रवास असेल असा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग आण निकोबार बेटांमध्ये 13 मे रोजच दाखल झाला आहे. तर मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. परंपरेपेक्षा पाऊसच आपल्या भेटीला आतुर झाला आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. त्यातच मान्सूनही वेळेआधी दाखल होत असल्याने पाणी टंचाईचे संकट नसेल आणि सगळीकडे आबादाणी होईल असा अंदाज आहे.

मान्सून लवकरच दाखल होणार

आज अंदमान मध्ये मान्सून दाखल झाला आहे. 27 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतेय. अंदमान मध्ये आठ ते नऊ दिवस आणि केरळात तीन ते चार दिवस अगोदर मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळे आणि आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे. येणार्‍या पाच दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ. एस.डी सानप यांनी दिली.