248 कोटींचा खर्च, 8 वर्षांची प्रतीक्षा… पण मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकर का संतापले?

मुंबईतील गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २५० कोटी खर्चून ८ वर्षांनी तयार झालेल्या या पुलाच्या रस्त्यावरील असमानतेमुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांची चिंता वाढली असून विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

248 कोटींचा खर्च, 8 वर्षांची प्रतीक्षा… पण मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकर का संतापले?
Mrinaltai Gore Flyover
| Updated on: Jun 12, 2026 | 9:41 AM

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणारे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. गोरेगाव आणि ओशिवरा भागाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तब्बल ८ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि २५० कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च होऊनही उड्डाणपुलाची झालेली अवस्था पाहून मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

२५० कोटींचा खर्च आणि ८ वर्षांचा विलंब

मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी आणि वाहतूक वेगवान करण्यासाठी या ७५० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले होते. वास्तविक पाहता हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे या प्रकल्पाला तब्बल ८ वर्षे लागली. या विलंबाने प्रकल्पाचा खर्च तब्बल २५० कोटी रुपयांवर पोहोचला. या उड्डाणपुलाच्या प्रत्येक मीटरसाठी प्रशासनाला लाखो रुपये मोजावे लागले आहेत.

उद्घाटनानंतर लगेचच उडाला दर्जाचा बोजवारा

उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओने सर्वांनाच धक्का बसला. या पुलाच्या रस्त्यावर जागोजागी टायरच्या खुणा पाहायला मिळत होत्या. तसेच ठिकठिकाणी झालेली दुरावस्था, असमान पृष्ठभाग (Uneven Surface) स्पष्टपणे दिसत आहेत. इतका मोठा खर्च करूनही पहिल्याच दिवशी रस्ता असा का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

या वादावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपली बाजू मांडली आहे. पालिकेच्या दाव्यानुसार, रस्त्याच्या वरच्या थरासाठी विशेष तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर करण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात अशा खुणा दिसणे सामान्य असून, नियमित वाहतुकीनंतर रस्ता सपाट होईल, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांनी यावर आणखी एक सवाल केला आहे. जर काम दर्जेदार झाले होते, तर उद्घाटनाच्या वेळीच रस्ता इतका खराब का दिसत होता? असा सवाल मुंबईकरांकडून केला जात आहे.

पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांची चिंता वाढली

मुंबईत पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. पहिल्याच पावसात या उड्डाणपुलावर खड्डे पडणार का? पाणी साचणार का? आणि भविष्यात दुरुस्तीसाठी पुन्हा जनतेचा पैसा खर्च होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, केवळ खांब मजबूत असून चालत नाही, तर रस्त्याचा पृष्ठभाग, ड्रेनेज सिस्टीम आणि वॉटरप्रूफिंग देखील तितकेच महत्त्वाचे असते. या मुद्द्यावरून आता मुंबईत राजकारणही तापले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कामावर तीव्र आक्षेप घेतला आहे. उड्डाणपुलाची ही अवस्था म्हणजे या कामात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराचा पुरावा आहे, असा आरोप त्यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Follow Us