
शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील मुलुंड (पश्चिम) भागात मोठी दुर्घटना घडली. मेट्रो लाइन ४ (ग्रीन लाइन) च्या बांधकामादरम्यान उंचावरील पॅरापेट (काँक्रीटचा भाग) कोसळला. या भाग एका चार चाकी वाहनावर आणि रिक्षावर कोसळला. त्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले. आता या प्रकरणी एमएमआरडीएने मोठी कारवाई केली आहे.
नेमकं काय केलं?
मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी एमएमआरडीएने कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले असून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, त्याचवेळी प्राथमिक चौकशीनंतर महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी एमएमआरडीएच्या या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले आहे. तर दुसरीकडे, मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
एकनाथ शिंदे यांचे सक्त कारवाईचे आदेश
मुलुंड एलबीएस मार्गावरील मेट्रो ब्रीज वरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. दूर्घटनेला जबाबदार सत्यजीत साळवे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित करण्यात आले आहे. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे देखील आदेश दिले आहेत. दुर्घटनाग्रस्त मेट्रो मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला कन्सल्ट करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला १ कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे. अपघाताला जबाबदार कंपनी मिलन इंफ्राला ५ कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे. MMRDA कडून मृत व्यक्ती ला १५ लाख रूपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.