मी निषेध बिषेध करणार नाही, झालं ते बरंच झालं; ललित कला केंद्रातील वादावर किरण मानेंची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 04, 2024 | 9:30 PM

Actor Kiran Mane on Lalit Kala Kendra Savitribai Phule Pune University Vad : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात नाटकातील संवादावरून वाद झाला. यावर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुक पोस्ट लिहित त्यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे.

मी निषेध बिषेध करणार नाही, झालं ते बरंच झालं; ललित कला केंद्रातील वादावर किरण मानेंची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई | 04 फेब्रुवारी 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील वाद आता आणखी पेटला आहे. ललित कला केंद्रात एक नाटक सादर झालं. यात श्रीराम आणि सीता यांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉगमुळे वाद निर्माण झाला आहे. यावर सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत समोर येत आहेत. यावर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुक पोस्ट लिहित त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मी निषेध बिषेध करणार नाही. झालं ते बरं झालं. आपला देश कुठे चाललाय? आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय. हे शंभर भाषणांतून कळणार नाही, असे एका घटनेतून कळलं आहे, असं किरण माने यांनी म्हटलं आहे.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

‘गाढवाचं लग्न’ या तुफानी गाजलेल्या वगनाट्याचा हिरो, ‘सावळ्या कुंभार’ स्वर्गात जातो आणि तिथल्या इंद्र वगैरे देवांचे अप्सरांशी चाललेले चाळे पाहुन ओरडतो, “इंद्राचा दरबार रंडीबाज !” टाळ्या आणि शिट्यांची बरसात व्हायची…

‘शोले’ मध्ये हेमामालिनीला पटवण्यासाठी धर्मेंद्र शिवशंकराच्या मुर्तीच्या पाठीमागे उभा राहून शंकरच बोलतोय असा भास निर्माण करतो… “हे हम बोल रहे है कन्याS” हा सिन पहाताना संपूर्ण देश हसून-हसून लोटपोट व्हायचा…

‘ह्योच नवरा पायजे’ सिनेमात दादा कोंडके रामदास स्वामींचा ‘दासबोध’ ग्रंथ घेऊन ‘दारूबोध’ असं वाचतात. त्यातले श्लोक वाचताना “मना सज्जना भक्ती बर्वे चेचावे… तरी श्रीहरी पाजी जे तो स्वभावे” असं वाचतात. सात मजली हास्यानं थिएटर दणाणून जायचं…

…काल ललित कला केंद्र, पुणे इथल्या नाटक शिकणार्‍या विद्यार्थ्यांचं एक असंच गंमतीशीर नाटक सुरू असताना अचानक काही धर्मांध गुंडांनी, दांडकी घेऊन, आरडाओरडा शिवीगाळ करत स्टेजवर घुसून कलाकारांवर जीवघेणा हल्ला केला. स्टेजवरचं साहित्य फेकून दिलं. मोडतोड केली. ‘आमच्या धर्माचा, देवांचा तुम्ही अपमान करत आहात. हे चालणार नाही.’ असे ते ओरडून सांगत होते.

बरं, नाटकाची गोष्ट अशीय की काही हौशी मुलांनी राम रावण युद्धाच्या कथेवरचं नाटक बसवलेलं असतं. नाटकाचा पहिला अंक झाल्यावर रामाची भुमिका करणारा नट नाटक सोडून पळून जातो. सगळे विचारात पडतात की नाटक पुढं कसं न्यायचं? मग रावणाचं काम करणारा नट सितेचं काम करणार्‍या नटाला म्हणतो की ‘सीतेलाच आता या नाटकाची हिरो करूया. तूच युद्ध कर आता माझ्याशी.’

हे नाटक पंधरा वीस मिनिटांचं होतं. मुलांच्या लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या परीक्षा असतात. त्या अंतर्गत हे नाटक सुरू होतं. हे परफाॅर्मन्स पहायला बाहेरून प्रेक्षकही येतात. अनेक वर्ष हा प्रघात आहे. त्यात घुसुन हे गुंड नाटकाला येऊन बसले होते. त्यांच्या विचारांच्या कुणी विद्यार्थ्याने ‘खबर’ दिली असावी. एकीकडे खोटा इतिहास सांगून लोकांना भरकटवून द्वेष पसरवणार्‍या सिनेमा-नाटकांना राजाश्रय मिळत असताना, दुसरीकडे विरोधी विचारधारांच्या कलांना दहशतीने दडपले जात आहे.

मी निषेध बिषेध करणार नाही. झाले ते बरे झाले. ‘आपला देश कुठे चाललाय? आपल्या पुढे काय वाढून ठेवलेय.’ हे शंभर भाषणांतून कळणार नाही, असे एका घटनेतून कळले आहे. प्रतिभावान कलाकारांच्या सत्वाची आणि स्वत्वाची कसोटी आहे ही. गुंडगिरीला भिऊन चालणार नाही. अशा गुंडांना रेटून आणि खेटून भिडायला शिका. अजून तरी, ही निवडणूक होईपर्यन्त तरी संविधानाचं राज्य आहे. पुढचं माहित नाही. संविधानानं आपल्याला खूप अधिकार दिलेले आहेत. त्याचं महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी ही घटना पूरक ठरली आहे हे लक्षात घ्या. लढा. भिडा. नडा.

कुणाला नाटकातला आशय आवडला नाही, काही गोष्टींवर आक्षेप असेल, तर त्यांना नाटकावर, कलावंतांवर कारवाई करण्याचे संवैधानिक मार्ग आहेत. स्टेजवर घुसून मारहाण करण्याचा अधिकार या देशात कुणालाच नाही.

मला असे कळले की या गुंडांनी जेव्हा अतिरेक केला… काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले… केंद्राच्या प्रमुख संचालकांशी गैरवर्तन झाले तेव्हा मात्र काही जिगरबाज विद्यार्थ्यांनी या गुंडांना मजबूत ठोके टाकले तेव्हा हा प्रकार थांबला. ज्जे ब्बात भावांनो. लब्यू. सृजनात्मक कला जिवंत ठेवण्यासाठी सज्ज होऊया.

– किरण माने.