
बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. आता परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी होऊ शकते. बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी बेस्ट प्रशासनाला उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण करण्याचे आदेश दिले होते. फडणवीस यांच्याबरोबरच्या बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा आग्रह धरला होता. बेस्टच्या महाव्यवस्थापक एस श्रीनिवास यांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच बेस्टच्या भाडेवाढीचे सुतोवाच केले होते.
बेस्ट उपक्रमाची संचित तूट सहा हजार कोटींच्या पलीकडे गेली आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात भाडेतत्त्वावर बेस्टच्या गाड्या खरेदी करून तिकीट पाच रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाचा तोटा उलट वाढतच गेला. बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागवणेही मुश्कील झाले आहे. कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाहीत. सध्या बेस्टला वार्षिक ८४५ कोटींचा महसूल मिळतो. भाडेवाढ झाल्यास वार्षिक उत्पन्न १४०० कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
| अंतर (किमी) | सध्याचे दर | नवीन दर |
| ५ | ५ रुपये | १० रुपये |
| १० | १० रुपये | १५ रुपये |
| १५ | १५ रुपये | २० रुपये |
| २० | २० रुपये | ३० रुपये |
| वातानुकूलित बस | ||
| अंतर (किमी) | सध्याचे दर | नवीन दर |
| ५ | ६ रुपये | १२ रुपये |
| १० | १३ रुपये | २० रुपये |
| १५ | १९ रुपये | ३० रुपये |
| २० | २५ रुपये | ३५ रुपये |
बेस्टची भाडेवाढ यापूर्वी २०१८ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी बेस्टचे भाडे आठ रुपये तर वातानुकूलित बसचे भाडे २० रुपये होते. परंतु २०१९ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात करत मुंबईकरांना दिलासा दिला होता. त्यांनी बेस्टचे भाडे पाच रुपये तर वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रुपये केले होते. त्यानंतर बेस्टचे भाडे वाढवण्यात आले नाही. बेस्टच्या भाडेवाढीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या महिन्याच्या बजेटमध्ये वाढणार आहे.