मुंबईच्या उपमहापौर पदासाठी दोन दिग्गज महिलांची नावे चर्चेत; कोणाची लागणार वर्णी?

मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ११ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटातून दोन महिलांची नावे आघाडीवर असून मुंबईत आता महिलांचे वर्चस्व दिसण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या उपमहापौर पदासाठी दोन दिग्गज महिलांची नावे चर्चेत; कोणाची लागणार वर्णी?
BMC eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Feb 05, 2026 | 12:04 PM

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यानंतर मुंबई महापालिकेचा महापौर आणि उपमहापौरपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. येत्या ११ फेब्रुवारीला ही निवडणूक पार पडणार आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या उपमहापौरपदी महिला विराजमान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापौर आणि उपमहापौर पदी महिलांचीच वर्णी

मुंबई महापालिकेत सत्ताधारी महायुतीला बहुमत मिळाले आहे. संख्याबळाचा विचार करता मुंबईचा पुढील महापौर भाजपचा होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. महायुतीमधील जागावाटपानुसार, मुंबईचे उपमहापौर पद शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेले आहे. विशेष म्हणजे, यंदा महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर महिलांचीच वर्णी लागण्याची शक्यता असल्याने मुंबईच्या राजकारणात महिलांचे वर्चस्व निर्माण होणार आहे.

दोन नाव चर्चेत

शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी दोन अनुभवी महिला नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. यातील पहिले नाव म्हणजे तृष्णा विश्वासराव यांचे आहे. तृष्णा विश्वासराव हे मुंबई महापालिकेतील एक अतिशय अनुभवी नाव आहे. २०१४ च्या कार्यकाळात त्यांनी सभागृहनेत्या म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

तसेच यामिनी जाधव यांचेही नाव उपमहापौर म्हणून चर्चेत आहे. २०१४ मध्ये जेव्हा महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते, तेव्हा स्नेहल आंबेकर यांच्यासोबत यामिनी जाधव यांचे नाव शर्यतीत होते. मात्र, त्यावेळी त्यांची संधी थोडक्यात हुकली होती. त्यामुळे यंदा उपमहापौर पदासाठी त्यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाकडे?

गेल्या काही काळापासून मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती. आता लोकनियुक्त प्रतिनिधींच्या निवडीमुळे पालिकेच्या कामकाजाला पुन्हा वेग येणार आहे. आता येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. मुंबईच्या या महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागते, तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.