मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला, महानगर गॅसकडून CNG दरात वाढ
राज्यात महागाईचा भडाका उडाला असताना अन् दुष्काळाच्या झळा बसत असताना आता मुंबईकरांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि परिसरात सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai CNG Price Hike: मुंबईकरांसाठी सर्वात मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे राज्यात महागाईचा भडाका उडाला असताना अन् दुष्काळाच्या झळा बसत असताना आता मुंबईकरांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महानगर गॅस लिमिटेडने (MGL) मुंबई आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात प्रति किलो ₹1.50 ने वाढ केली असून, सुधारित दर प्रति किलो ₹91.50 झाला आहे. हे नवीन दर 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील. या निर्णयामुळे आता रिक्षाचालक, टॅक्सी चालक तसेच खासगी सीएनजी वाहनधारकांना थेट फटका बसणार आहे.
का केली दरवाढ?
MGL च्या म्हणण्यानुसार, मध्य-पूर्वेतील सध्याच्या संकटामुळे वाढलेला खरेदी खर्च, देशांतर्गत गॅस वाटपात झालेली घट आणि महागड्या आयातित रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसवरील (RLNG) वाढलेले अवलंबित्व यामुळे ही दरवाढ करणे आवश्यक झाले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांना सीएनजीचा अखंड आणि शाश्वत पुरवठा सुनिश्चित करताना, उत्पादन खर्चातील वाढीची अंशतः भरपाई करणे हा या दरवाढीचा उद्देश आहे. ही नवीनतम दरवाढ मुंबईत 15 दिवसांच्या कालावधीत झालेली दुसरी दरवाढ आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी या इंधनावर अवलंबून असलेल्या वाहनचालक आणि प्रवाशांवरील आर्थिक भार वाढला आहे.