मैत्रिणीच्या हट्टापायी मर्सिडीज पळवली अन् पुढच्या क्षणी… कोस्टल रोडवर मध्यरात्री काय घडलं?

मुंबईच्या कोस्टल रोडवर भरधाव मर्सिडीजने दिलेल्या धडकेत तिघे जखमी झाले आहेत. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने वेगावरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी कार मालक आणि चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मैत्रिणीच्या हट्टापायी मर्सिडीज पळवली अन् पुढच्या क्षणी... कोस्टल रोडवर मध्यरात्री काय घडलं?
Coastal Road Accident
| Updated on: Feb 03, 2026 | 12:08 PM

मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडवर सोमवारी (१ फेब्रुवारी) मध्यरात्री एक भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव अलिशान मर्सिडिज कारने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडवणारा चालक हा अल्पवयीन असून तो त्याच्या मैत्रिणीची कार चालवत होता.

नेमकं काय घडलं?

मिरा रोड येथे राहणारे प्रसन्न मॉपकर (३६) हे सोमवारी मध्यरात्री आपल्या पत्नी आणि सासूसोबत इकोस्पोर्ट कारने दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बडेमियाँ हॉटेलमध्ये जेवणासाठी निघाले होते. रात्री १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांची कार कोस्टल रोडच्या बोगद्यातून जात होती. त्यावेळी मागून येणाऱ्या एका भरधाव मर्सिडीजने त्यांना भीषण धडक दिली. या मर्सिडीजचा वेग इतका प्रचंड होता की, मॉपकर यांच्या इकोस्पोर्ट कारने होंडा सिटी कार आदळली. या विचित्र अपघातात मॉपकर कुटुंबातील तिघेही जखमी झाले आहेत. यात प्रसन्न यांच्या पत्नीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या जखमींना तातडीने जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डी. बी. मार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता ही मर्सिडीज कार आग्रीपाडा येथील एका ज्येष्ठ व्यावसायिकाच्या नावे असल्याची माहिती समोर आली. सदर व्यावसायिकाची १७ वर्षीय नात रात्री घरून कार घेऊन निघाली होती. सुरुवातीला ती स्वतः गाडी चालवत होती, मात्र काही अंतर पार केल्यानंतर तिने गाडी चालवण्यास आपल्या अल्पवयीन मित्राला दिली. कोस्टल रोडच्या बोगद्यात या मुलाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. प्राथमिक तपासात हा चालक मद्यधुंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बेदरकारपणे गाडी चालवणे हेच अपघाताचे मुख्य कारण ठरले.

पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कार मालक वृद्ध व्यावसायिक, त्यांची नात आणि कार चालवणारा अल्पवयीन मुलगा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार निष्काळजीपणा आणि मानवी जीव धोक्यात टाकल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.