भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ

Mumbai Accident : मुंबईत दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या बांधकाम स्थळावर क्रेन कोसळून झालेल्या एका भीषण अपघातात दोन जणांचा बळी गेला. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत.

भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
Mumbai Accident
Image Credit source: Google
| Updated on: May 02, 2026 | 5:26 PM

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. दहिसर-भाईंदर लिंक रोडचे काम सुरू असताना क्रेन कोसळून 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एल अँड टी कंपनीची क्रेन कोसळून ही दुर्घटना घडली आहे. रघुनाथ दास आणि काना सिंग अशी मृत कामगारांची नावे आहेत, आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

क्रेन कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

दहिसर-भायंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी एल अँड टी (L&T) प्रकल्पाच्या ठिकाणी घडली आहे. मृतांची ओळख रघुनाथ दास (38) आणि काना सिंग (45) अशी पटली आहे. हे दोन्ही कामगार एल अँड टी (L&T) कंपनीद्वारे बांधण्यात येत असलेल्या दहिसर-भायंदर लिंक रोड प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत होते. क्रेनवर काम करत असताना ती अचानक कोसळली. या अपघातात अनेक जणही जखमी झाले आहेत.

कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. भायंदर पश्चिम येथील या प्रकल्पातील हा पहिला मोठा अपघात असून, त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी ड्रिलिंग मशीन अंगावर पडून पोलीस हवालदाराचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी मानखुर्द परिसरात बीएमसीच्या उड्डाणपुलाच्या बांधकाम स्थळावर ड्रिलिंग मशीन अंगावर पडून एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला होता. मृत हवालदाराचे नाव संतोष चव्हाण असे होते, ते नेहरू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अपघात घडला तेव्हा ते घरी जात होते. ड्रिलिंग मशीन ही असमान पद्धतीने जमिनीवर बवल्याने भूस्खलन होऊन ही ड्रिलिंग मशीन उलटली असावी, असा संशय आहे. याबाबत कंत्राटदाराला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Follow Us