Dadar Kirit Vadapav : मुंबईतला फेवरेट वडापाव स्पॉट, दादरच्या प्रसिद्ध किर्ती वडापावचा रेट वाढला, नवीन दर काय?
Dadar Kirit Vadapav : वडापाव ही मुंबईची एक ओळख आहे. या वडापावने जसं पोटं भरलं तसंच अनेकांना रोजगारही दिले. महागाईमुळे शहरातील लोकप्रिय आणि प्रख्यात अशोक वडापाव अर्थात किर्ती वडापावच्या दरातही वाढ झाली आहे.

मुंबईतला चविष्ट, स्वस्तात मिळणारा खाद्यपदार्थ कुठला तर चटकन तोंडावर वडापावचं नावं येतं. वडापावला मुंबईची ओळख म्हटलं तरी चुकीच ठरणार नाही. गरीबापासून ते श्रीमंत व्यक्ती, सेलिब्रिटी पर्यंत सर्वांना हा वडापाव आवडतो. वेळेबरोबर या वडापावमध्ये अनेक बदल झाले. आज वेगवेगळ्या प्रकारचा वडापाव मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो. या मुंबईने अनेकांना ओळख मिळवून दिली. त्यातल्या काहींनी वडापाव खाऊन दिवस काढले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण सांगताना ते या वडापावबद्दल आवर्जुन बोलतात. अगदी काही पैशांपासून मिळणार हा वडापाव एक रुपया, मग दोन रुपय, तीन रुपये, पाच-दहा, 15-20 रुपयापर्यंत पोहोचला. आता या इराण-अमेरिका युद्धाचा वडापावला सुद्धा फटका बसतो आहे. या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. परिणामी महागाई भडकली. आता या वडापावची किंमत सुद्धा वाढली आहे.
15-20 रुपयांना मिळणारा एक वडापाव आता 25 रुपयांना मिळतोय. कारण पेट्रोल-डिझेलच नाही, खाद्य तेलही महागतय. मुंबईत पेट्रोल-डिझेलसह इंधन दरवाढीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर दिसू लागला आहे. शहरातील लोकप्रिय आणि प्रख्यात अशोक वडापाव अर्थात किर्ती वडापावच्या दरात ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 30 रुपयांना मिळणारा वडापाव आता 35 रुपयांना विकला जात आहे. इंधनाचे वाढलेले दर, वाहतूक खर्च आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने दरवाढ करावी लागल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
ग्राहकांमध्ये नाराजी
मुंबईकरांच्या दैनंदिन खाण्यातील महत्त्वाचा आणि परवडणारा पर्याय मानला जाणारा वडापाव महागल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “सर्व वस्तू महाग होत आहेत. वडापावसारखा सामान्य माणसाचा पदार्थही आता महाग झाला आहे. खिशाला परवडत नाही, दर वाढायला नकोत. वडापाव २० रुपयांत मिळायला हवा,” अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे छोट्या खाद्यपदार्थांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत अनेक नावाजलेले वडापाव स्पॉट्स आहेत. तिथे दररोज तुम्हाला खवय्यांची गर्दी दिसेल. वडापाव हा पदार्थ जिभेला चवही आणतो आणि पोटही भरतो. म्हणून वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.