मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हार्बर मार्गावर दर अडीच मिनिटाला लोकल सोडण्याचा विचार

हार्बर मार्गावर राहणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर दर अडीच मिनिटाला एक लोकल सोडण्याचा विचार करत आहे (Frequency of train on harbour line).

  • अंकिता म्हसळकर, टीव्ही9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:55 PM, 5 Dec 2019
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हार्बर मार्गावर दर अडीच मिनिटाला लोकल सोडण्याचा विचार

मुंबई : हार्बर मार्गावर राहणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर दर अडीच मिनिटाला एक लोकल सोडण्याचा विचार करत आहे (Frequency of train on harbour line). त्यानुसार हार्बर मार्गावर दिवसाला एकूण 4500 लोकलच्या फेऱ्या सोडाव्या लागणार आहे. सध्या या मार्गावर दिवसाला 3000 फेऱ्या सोडल्या जात आहेत. कम्युनिकेशनवर आधारीत ट्रेन कंट्रोल सिस्टमची (सीबीटीसी) पूर्णपणे अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर अशी सेवा सुरु करता येणार आहे (Frequency of train on harbour line).

सीबीटीसी हे तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे मार्गावर असलेल्या सिग्नलसाठीच्या खांबांची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे लोकलमध्ये सर्व सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे लोकलचा वेग वाढणार आहे. तसेच दोन लोकलमधील रेल्वे ट्रॅकचं अंतरही कमी होईल. सीएसएमटी (CSMT) ते पनवेल लोकल दर 150 सेकंदाला शक्य होईल. ही सेवा कार्यान्वित होण्यासाठी 2023 पर्यंतचा वेळ लागणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबईतील सर्वात वेगवान आणि सोयीची वाहतूक म्हणून मुंबई लोकलकडे पाहिलं जातं. मात्र, लोकल वाहतुकीवर गर्दीचा ताणही वाढला आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे गर्दीची विभागणी होऊन लोकल वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लोकलचं महत्त्व मोठं आहे. म्हणूनच पावसाळ्यात लोकल ट्रॅकवर पाणी साठल्यावर लोकल ठप्प होऊन याचा थेट परिणाम मुंबईच्या दळणवळणावर पडतो. कधीकधी तर मुंबई ठप्प झाल्याचंही पाहायला मिळतं. म्हणूनच लोकल व्यवस्था अधिकाधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.