Mumbai | मुंबईतील घरबांधणी प्रकल्पात भ्रष्टाचार? लोकायुक्तांनी मागवला अहवाल, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपावरून कारवाई

रवी राजा यांच्या तक्रारीची लोकायुक्तांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणी महापालिका आय़ुक्त व नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Mumbai | मुंबईतील घरबांधणी प्रकल्पात भ्रष्टाचार? लोकायुक्तांनी मागवला अहवाल, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपावरून कारवाई
| Edited By: | Updated on: Jul 02, 2022 | 12:52 PM

मुंबईः  मुंबईतील भांडुप, मुलुंड, परळी, चांदिवलीत सुमारे 14 हजार घरे बांधली जाणार असून या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप (Congress Allegations) केला जातोय. या प्रकरणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. लोकायुक्तांनी आता या घरबांधणी प्रकल्पाचा अहवाल मागितला आहे. या प्रकल्पात बिल्डरांचा फायदा होईल, असे पालिकेचे वर्तन असल्याची तक्रार काँग्रेसचे रवी राजा यांनी केली होती. आता पालिका आयुक्त आणि राज्याच्या नगरविकास विभागाने प्राथमिक चौकशी अहवाला लवकरात लवकर पाठवावा, अशा सूचना लोकायुक्तांनी दिल्या आहेत.

काय आहेत आरोप?

मुंबई महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त बाधितांसाठी भांडुप, मुलुंड, वरळी, चांदिवलीत सुमारे 14 हजार घरे बांधली जाणार आहेत. या प्रकल्पाचा बांधकाम खर्च सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये आहे. बांधकामाच्या बदल्यात बिल्डरांना टीडीआर, प्रीमियम व क्रेडिट नोटपोटी तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा फायदा पालिकेतर्फे करून दिला जाणार असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षवेते रवी राजा यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र महापालिकेने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

8 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

रवी राजा यांच्या तक्रारीची लोकायुक्तांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणी महापालिका आय़ुक्त व नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारीत दाखल करण्यात आलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ रवी राजा यांनी कागदपत्रेही लोकायुक्तांना पाठवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी गैरव्यवहार, विकासकास फायदा व पालिकेस नुकसान होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांची नावे व पदनाम आदींची माहिती रवी राजा यांनीही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावी, तसेच आधीच्या पत्रव्यवहारांच्या प्रतीही पाठवाव्यात असे सांगण्यात आले आहे.