गिरणी कामगार ‘संप’ला की संपवला? कुणामुळे देशोधडीला लागला? 82 च्या संपावेळीच्या मागण्या काय होत्या?

गिरणी कामगार असणं हा त्या काळात एक स्टेटस सिम्बॉल होता. मी गिरणी कामगार आहे, असं कर्मचारी रुबाबाने सांगत. पण, त्याचा हा रुबाबही संपला आणि त्यापाठोपाठ गिरणी कामगारही... तो का संपला? आंदोलनातील अवास्तव मागण्या की संघटनेत नेत्यांचा वाढता हस्तक्षेप? गिरणी कामगार संपला की संपवला गेला? 1982 च्या संपावेळी नक्की काय झालं होतं? या आंदोलनाची ठिणगी नक्की कुठे पडली?

गिरणी कामगार 'संप'ला की संपवला? कुणामुळे देशोधडीला लागला? 82 च्या संपावेळीच्या मागण्या काय होत्या?
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 4:59 PM

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा वाजला की अवघी मुंबापुरी दणाणून जायची. त्याच वाजणाऱ्या भोंग्यावर लोक आपल्या घड्याळाला चावी देत असत. नेमके किती वाजले हे सांगणारा गिरणीचा भोंगा लुप्त झाला. सरकारी नोकरीपेक्षा गिरणी कामगार असणं तेव्हा प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला घरटी माणूस हा गिरण कामगार होता. गिरण सुटण्याची वेळ झाली की शक्यतो लोकं बाहेर निघायची नाहीत. कारण, गिरणीतून बाहेर पडणाऱ्या कामगारांचा लोंढा अशा रीतीने येत असे की जणू समुद्राला आलेली भरती. काही काळी मुंबईचे वैभव असणारी गिरणी आणि गिरणी कामगार कसा संपला? त्याला जबाबदार कोण? गिरणी कामगारांचा 82 मध्ये झालेल्या संपाची परिणीती काय? संप यशस्वी झाला की नाही? त्यानंतर काय परिस्थिती होती? जाणून घ्या.

मुंबईतील गिरण्यांचा इतिहास

7 जुलै 1854 साली मुंबईतील ताडदेव येथे मध्ये पहिली कापड गिरणी सुरू झाली. उद्योगपती कावसजी नानाभाई डावर यांनी ही गिरण सुरू केली. बॉम्बे टेक्सटाईल मिल्स असं या गिरणीचं नाव होतं. दिवसेंदिवस गिरण व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आणि गिरणी मुंबईत झाल्या. गिरणी कामगार म्हणजे सरकारी नोकरीपेक्षा जास्त वेतन. त्यामुळे गिरणी कामगाराला गावात मोठा मान होता. मुंबईत अनेक गिरण्या होत्या, हा आकडा 100 पेक्षाही जास्त होता असं सांगितलं जातं. यात सर्वात मोठी गिरणी होती ती वरळीमधील सेंच्युरी मिल. या गिरणीमध्ये तब्बल 15,000 कामगार तीन शिफ्टमध्ये काम करत होते. तर, लालबागच्या इंडिया युनायटेड मिल नंबर 1 (India United Numer 01) या गिरणीतही तब्बल 12 हजार कामगार होते. तर, सर्वात लहानातील लहान गिरणी म्हटली तरी तिथे 3 हजार गिरणी कामगार काम करत असत.

मुंबईमधील गिरणींची संख्या वाढण्याचं कारण?

मुंबईमध्ये गिरण्यांची संख्या वाढण्याचं कारण म्हणजे इथलं हवामान… मुंबईचं हवामान दमट होतं. त्या हवामानामध्ये कपड्याचा धागा तुटायचा नाही. महाराष्ट्रात कापसाचं पिक विपुल प्रमाणात आहे. पण, शेतकऱ्यांकडील या कापसापासून आखूड धागा तयार व्हायचा. तो कपडा निर्मितीसाठी उपयोगी पडायचा नाही. त्यामुळे गिरण्यांसाठी लागणारा कापूस परदेशामधून आयात करावा लागत असे. कापूस आयात करण्यासाठी आणि तयार झाले कापड निर्यात करण्यासाठी मुंबईचं बंदरही जवळ होतं. त्यासाठी लागणारं मनुष्यबळही मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. त्यामुळे मुंबईत कापड गिरण्यांची संख्या दिवसागणिक वाढत होती.

तीन शिफ्टमध्ये काम

गिरणी कामगार तीन शिफ्टमध्ये काम करत असत. पहिली शिफ्ट सकाळी 7 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत असायची. त्यानंतर दुसरी शिफ्ट 3.30 ते 12.00 आणि रात्रीची शिफ्ट 12 ते सकाळी 7 पर्यंत असायची. तीन शिफ्टमध्ये गिरणी कामगार राबत होते. एका गिरणी कामगार एकाचवेळी साधारण चार साचे चालवत असे. प्रत्येकजण प्रामाणिकपणे काम करायचा. पण त्यांचीही एक खंत होती आणि त्यातूनच कधी कधी छोटे मोठे संप होत होते.

गिरणी कामगार संपावर गेले? असा मिळाला पहिला बोनस

गिरणी कामगारांना पगार इतर कामगारांच्या तुलनेत चांगला होता. तरीहे ते संपावर जायचे. याचं कारण म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनच गिरणी कामगारांचे संप होत होते. त्यातील सर्वात मोठा संप हा 1940 सालचा. सलग 40 दिवस हा संप झाला होता. या संपामध्ये महागाई भत्ता मिळावा ही त्यांची मागणी होती. 40 दिवसांचा संप करून त्यांनी महागाई वाढेल तसा निर्देशांकाप्रमाणे महागाई भत्ता मिळवण्याची मागणी मान्य करून घेतली. पण, 1948 नंतर गिरणी कामगारांच्या मूलभूत प्रश्नांना कधीच हात घातला गेला नाही. जस जसे दिवस जात होते तस तसे अनेक बदल होत होते. महागाई वाढत होती म्हणून आपल्या मागण्यांसाठी गिरणी कामगार संपावर जात होते.

1971 मध्ये गिरणी कामगारांनी 5 दिवसाचा सार्वत्रिक संप केला. या संपामुळे गिरणी मालकांनाही हार मानावी लागली. या संपाचा परिणाम असा झाला की किमान 8.33 टक्के पहिला बोनस कायदा झाला. 1973-74 साली 42 दिवसांच्या संपातही जुजबी पगारवाढीशिवाय त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. 1979 साली गिरणी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे एक वर्षाचा संप करून सार्वत्रिक संपाची तयारी सुरु होती. मात्र, हा संप सुरू होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगारांना 45 रूपयांची तोकडी वाढ देत हा संप रोखून धरला.

गिरणी धंदा कारखानदारीत अग्रगन्य होता. कामगार वर्ग म्हणजे गिरणी कामगार, रेल्वे कामगार आणि इ. यामध्ये सर्वात जुनी कारखानदारी म्हणजे कापड गिरणीची, जी 75 वर्षांची होती. महागाई निर्देशांकाप्रमाणे महागाई भत्ता, बोनस, 8 तासांचा दिवस, पगारी रजा आणि पगाराचे स्टँडर्ड हे सर्व हक्क मुंबई गिरणी कामगारांनी लढा देत मिळवले. प्रॉव्हिडंट फंडाचे 1950 ला कायद्यामध्ये रूपांतर झालं. त्यामुळे 1947 ला पुढारलेला गिरणी कामगार 80 च्या दशकात मात्र मागास राहिला.

गिरणी कामगारांची पीछेहाट

स्वातंत्र मिळाल्यावर 1982 पर्यंत गिरणी कामगारांची 35 वर्ष पीछेहाट झाली. कारण, पगारवाढ नाही, वेतनश्रेणी नाही, कापूस जाऊन कृत्रिम रसायनी धागे आले होते. नवीन कापडे आली होती. 30 ते 35 वार कापड काढण्याच्या जागी एक कामगार 2400 मीटर कापड काढू शकेल असा सुझलर साचा आला होता. मुलेर, काडिंग, स्पिनिंग खाती आणि त्यासाठी लागणारे 240 कामगार यांच्या जागी सर्व काम एकत्र करणारे ओपन स्पिनिंग मशीन आणलं. या मशीनसाठी फक्त 14 कामगार लागत होते. मात्र, त्यावेळीही स्टँडर्ड तेच राहिले. या दरम्यान 35 वर्षात मुंबईच्या उपनगरांमध्ये नवीन औद्यागिक साम्राज्ये निर्माण झाली. मोटार, इंजिनियरिंग, केमिकल औषधी कारखाने आणि रबर टायरचे कारखाने उभे राहिले होते.

गिरणी कामगारांच्या बळावर गिरणी मालकांनी भांडवलाच्या पाच ते सहा पट नफा मिळवला होता. मालकांनी अन्य काही कंपन्याही उभ्या केल्या होत्या. ज्यावेळी गिरणी कामगाराचे वेतन मासिक 470 रूपये होते. त्यावेळी नव्याने उभ्या राहिलेल्या कंपन्यांमधील कामगारांचे किमान वेतन काय होते ते जाणून घेऊ.

1980 मध्ये इंदिरा गांधी परत एकदा केंद्रात आल्या. त्या काळात महागाई वाढली होती. 35 टक्क्यांनी महागाई वाढली. या महागाईमुळे गिरणी कामगार त्रस्त झाला होता. नवीन औद्योगिक साम्राज्यात कामगारांच्या पगारवाढीची लाट उसळली. अनेक कंपन्यांनी 200 रुपये तर काहींनी 350 रुपये पगारवाढ देत इतर सवलती दिल्या. नव्याने आलेल्या कंपन्यांमध्ये झालेली पगारवाढ पाहता गिरणी कामगार कोंडीत अडकला होता. प्रवासभत्ता नाही, घरभाडे नाही, वेतनश्रेणी नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा 82 साली संपाची हाक दिली. या संपामध्ये 62 गिरण्यांनी सहभाग घेतला होता त्यामधील एकूण दोन लाखांपेक्षा जास्त गिरणी कामगार या संपामध्ये सहभागी झाले होते. यावरून दिसून येतं की त्यावेळी मुंबईनगरीमध्ये गिरणी कामगारांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात होतं.

डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली संप

1 नोव्हेंबर 1981 रोजी कामगारांना पगारवाढ दिली नाही तर 15 नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील अशी घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यामुळे गिरणी कामगार यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांनी चर्चा केली. पण, चर्चेनंतर त्यांनी संप करत नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे पदरी निराशा पडलेल्या गिरणी कामगारांनी दत्ता सामंत यांनी संपाचे नेतृत्त्व करावं अशी गळ घातली. अखेर 18 जानेवारी 1982 ला गिरणी कामगारांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संपाला सुरूवात झाली.

काय होत्या गिरणी कामगारांच्या प्रमुख मागण्या?

बॉम्बे इंडस्ट्रियल रेग्युलेशन कायदा रद्द करणे, पगारांचे आणि कामाचे नवीन स्टँडर्ड, महागाई भत्त्याची पुनर्रचना, 240 दिवसांच्या हजेरीची अट रद्द करणे, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता, कॅज्युअल भर पगारी रजेत वाढ, तत्काळ 200 रू. हंगामी पगारवाढ, किमान 12 टक्के बोनस अशा प्रमुख मागण्या गिरणी कामगारांनी केल्या होत्या. संप सुरू झाला तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांनी देशात केलेला हा पहिला संप ठरला. या संपाची देशभर जोरदार चर्चा झाली. संपाची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली. त्यांनी दत्ता सामंत यांना दिल्लीला भेटायला बोलावले. मात्र, दत्ता सामंत त्यांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी ऐनवेळी भेट नाकारली, असे दत्ता सामंत याचे सहकारी आणि गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे यांनी सांगितलं. संप सुरू असताना विरोधी पक्षाने आवाज उठवला नाही. उलट संप फोडण्यासाठी अरूण गवळी, रमा नाईक या गँगस्टरकडून संप फोडण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप जयप्रकाश भिलारे यांनी केला.

संप अजूनही सुरूच आहे, अधिकृत घोषणा नाहीच

एकीकडे संप सुरु होता तर दुसरीकडे सरकारने संप फोडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. पुणे आकाशवाणीवरून सातच्या बातम्यांमध्ये गिरणी कामगार कामावर आल्याचं सांगितलं. या बातमीमुळे एकच गहजब झाला. गावी गेलेले गिरणी कामगार गोंधळले. गावी निघुन आल्यावर त्यांच्या घरी दोन वेळचे जेवण मिळण्याचीही मारामारी होती. संपाला सहा महिने लोटले. वर्ष झाले तसा कामगारांचा धीर सुटला. ते पुन्हा माघारी परतले. आर्थिक परिस्थिती त्यांना घरात जास्त काळ कोंडून ठेवू शकली नाही. अनेक कामगार मुंबईला परतले, कामावर जाऊ लागले. मात्र, काही जणांनी संपाला साथ देत घरीच राहणे पसंद केले. गिरणी कामगारांचा दीर्घकाळ सुरु असलेला हा संप इथेच खऱ्या अर्थाने विखुरला असं म्हणता येईल. मात्र, एक गोष्ट अशी आहे की 82 ला संपाची हाक दिली होती तो संप आजही 2024 मध्ये अधिकृतपणे मागे घेतला गेलेला नाही.

दत्ता सामंत यांची हत्या

इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये हत्या झाली. त्यासाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांची लाट आली होती. काँग्रेसच्या 404 जागा देशात निवडून आल्या. दत्ता सामंत यांनीही कामगार आघाडीकडून अपक्ष निवडणूक लढविली होती. दक्षिण मध्य मुंबईमधून दत्ता सामंत निवडून आले. लोकसभेमध्येही त्यांनी गिरणी कामगारांचा आवाज उठवला. तर त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत कामगार आघाडीच्या वनिता सामंत (दत्ता सामंत यांच्या पत्नी ) आणि अन्य दोन आमदार निवडून आले. दत्ता सामंत यांचा दबदबा वाढला. तो विरोधकांना सहन होत नव्हता. पुढे 16 जानेवारी 1997 ला त्यांच्या घाटकोपरमधील पंतनगर येथील घराजवळ सुमो गाडी अडवून 17 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

…अन् मुंबईतील गिरणी कायमच्या पडल्या बंद

1982 च्या संपानंतरही गिरणी कामगार कामावर परतले होते. तरीही गिरण्या कशा बंद पडल्या? कारण, संपानंतर पुन्हा गिरण्या सुरु झाल्या. पण, तंत्रज्ञानाने वेग घेतला होता. तर, मुंबईमधील गिरणी कामगार जुन्याच मशीनवर काम करत होते. याला गिरणी मालकांच्या नव्या पिढीची उदासीनता कारणीभूत होती. गिरणी मालकांनी नवी गुंतवणूक केली नाही. जुन्याच मशीन सुरु होतंय. उत्पादन घटले परिणामी शेवटच्या गिरणीचा अखेरचा घरघर आणि भोंगाही 2006 साली थांबला. आताच्या पिढीला गिरणी, गिरणी कामगार आणि त्याचा इतिहास सांगताना त्या भूतकाळातील आठवणी ताज्या होतात. आताही काही गिरणी कामगार आपल्या नातवंडांना तेव्हाचे किस्से सांगतात तेव्हा नकळत त्यांचे डोळेही पाणावतात.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.