मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदा उकाड्यापासून लवकर सुटका होणार; ‘या’ तारखेपासून पाऊस सक्रीय

मुंबईत असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पण आता हवामान विभागाचा अंदाज आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच ८ ते ११ जून दरम्यान मुंबईत मोसमी पाऊस येण्याची शक्यता आहे. हा अंदाज ९२ टक्के अचूक असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदा उकाड्यापासून लवकर सुटका होणार; या तारखेपासून पाऊस सक्रीय
mumbai rain
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 22, 2025 | 3:56 PM

सध्या मुंबईत असह्य उकाडा जाणवत आहे. या उकाड्यामुळे अनेक मुंबईकर हे हैराण झाले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार असून पावसाळ्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

८ ते १२ जूनदरम्यान पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये दरवर्षी पाऊस हा १० जूननंतर सुरु होतो. पण यंदा ८ ते ११ जून दरम्यान पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या ८ ते १२ जूनदरम्यान पाऊस सुरु होईल, असा ९२ टक्के अंदाज आहे. गेल्यावर्षी मोसमी पाऊस ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता, तर २०२० मध्ये १४ जून रोजी पावसाचे आगमन झाले होते. पण यावर्षी मुंबईत लवकर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

हवामान विभागाचा अंदाजामागील कारणे

दरवर्षी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास बंगालच्या उपसागरातून सुरू होतो आणि ते १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतात. त्यानंतर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचतात. महाराष्ट्रात साधारणतः १० जूनपर्यंत मोसमी पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे.

१०५ टक्के पावसाचा अंदाज

संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रिय असणार नाही. तसेच, हिंदी महासागरीय द्वीध्रुवीयताही तटस्थ आहे. याव्यतिरिक्त, डिसेंबर ते मार्च या काळात युरेशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला आहे. या सर्व घटकांचा विचार करून भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त, म्हणजेच १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

उकाड्यापासून मुंबईकरांना मिळणार दिलासा

यामुळे एकंदरीत यंदा मुंबईकरांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे.