मोठी बातमी | मालवणी राडा प्रकरणी 25 जणांना अटक, तणावपूर्ण शांतता, रामनवमीला काल काय घडलं?

| Updated on: Mar 31, 2023 | 11:04 AM

काल संभाजीनगरात झालेल्या राड्यानंतर आज मुंबईतदेखील दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावरून संजय राऊत यांनी भाजप-शिंदे सरकारला दोषी धरलंय.

मोठी बातमी | मालवणी राडा प्रकरणी 25 जणांना अटक, तणावपूर्ण शांतता, रामनवमीला काल काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कृष्णा सोनरवाडकर, मुंबई | छत्रपती संभाजीनगरात (Sambhajianagar) बुधवारी रात्री घडलेल्या राड्या नंतर मुंबईतील (Mumbai) मालवणी (Malwani) येथे गुरुवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. दोन गटात आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान हा तणाव निर्माण झाला. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना येथे लाठीचार्जही करावा लागला. आज शुक्रवारी सकाळी या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे तर आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

रात्री नेमकं काय घडलं?

मुंबईतील मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात काल राम नवमीनिमित्तची शोभायात्रा जात होती. या वेळी दोन गटात काही कारणांवरून वाद झाले आणि परस्परांना हाणामारी सुरु झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगण्यासाठी लाठीमारही केला. त्यानंतर येथील तणाव निवळला. मात्र सदर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

भाजपच्या सरकारमध्ये दंगे- राऊत

काल संभाजीनगरात झालेल्या राड्यानंतर आज मुंबईतदेखील दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावरून संजय राऊत यांनी भाजप-शिंदे सरकारला दोषी धरलंय. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रासह सर्व देशात रामनवमी निमित्त दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला. काही ठिकाणी तो यशस्वी झाला तर काही ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. दंगल होऊ द्यायची नाही असे लोकांनी ठरवले होते. पण संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची 2 तारखेला सभा आहे. ती सभा होऊ द्यायची नाही. कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन परवानगी नाकारायची वातावरण खराब आहे तणावपूर्वक आहे असे सांगायचे, असा सरकारचा डाव असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

यापूर्वी रामनवमीच्या शोभायात्रा झाल्या. गुडीपाडव्याच्या शोभायात्रा झाल्या. मालवणीत पण असाच प्रकर झाला. खासकरून खेड मालेगावातूल सभांना जो प्रतिसाद मिळाला आहे तो पाहाता काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यानंतर काही लोक हाताशी धरून वातावरण खराब करायचे, तेढ निर्माण करायची, असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळेच सरकारला नपूंसक म्हटले जात आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.