साकीनाक्यात दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट कागदपत्रांसाठी आमदारांच्या लेटरहेडचा वापर

| Updated on: Nov 02, 2020 | 4:08 PM

या बांग्लादेशींनी स्थानिक पातळीवरील कागदपत्रे बनवण्याकरता दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर केला होता. | Mumbai Police

साकीनाक्यात दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट कागदपत्रांसाठी आमदारांच्या लेटरहेडचा वापर
Follow us on

मुंबई: मुंबईच्या साकीनाका परिसरातून पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या दोघांची तपासणी केली असता या दोघांनी वेगवेगळ्या मोबाईलमधून ॲपद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून बांगलादेशात राहणाऱ्या लोकांशी संवाद साधल्याचे पुरावे मिळाले. यानंतर पोलिसांनी पारपत्र कायद्यातंर्गत दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Police arrested two Bangladeshi citizens)

या दोन्ही बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, एका एजंटकडून त्यांची मुंबईत राहण्याची सोय करण्यात आली होती. तसेच भारतीय नागरिक असल्याची बनावट ओळखपत्रे तयार करण्यासाठी याच एजंटने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी संबंधित एजंटला ताब्यात घेऊन त्याचीही चौकशी केली.

त्याने सांगितले की, तो बांगलादेशी नागरिकांचे आधार कार्ड व त्यानंतर पासपोर्ट असे नाशिक मालेगाव येथील एजंट यांच्याकडून बनवून घेत असे. त्यावरून पोलिसांनी मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणच्या एका एजंटला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देखील बांगलादेशी नागरिकाचा एक भारतीय पासपोर्ट मिळाला. पोलिसांनी मालेगाव येथील एजंटच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडेदेखील मोठ्या प्रमाणात भारतीय ओळखपत्रे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने मिळाली. सध्या पोलिसांकडून या ओळखपत्रांची पडताळणी सुरु आहे. तसेच एजंट लोकांना आधार कार्ड बनवण्यासाठी कोण मदत करत आहे याचादेखील शोध साकीनाका पोलीस करत आहेत.

दरम्यान, या बांग्लादेशींनी स्थानिक पातळीवरील कागदपत्रे बनवण्याकरता दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमआयएम या पक्षाचे हे दोन आमदार असून एकूण सात आमदारांची पत्रे तपासादरम्यान सापडली आहेत. यापैकी दोन लेटर हेडवर आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खालीख आणि आमदार शेख असिफ शेख रशीद यांची नावे आहेत. याबाबत एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयातून आधार कार्डसाठी पत्र दिले जात असताना संबंधित नागरिकांची कागदपत्रे तपासली जातात. त्याच्या नोंदीही ठेवल्या जातात. त्यामुळे या प्रकरणात माझ्या नावाने जे पत्र सापडले आहे त्याची तपासणी केली पाहिजे. जे लोक बोगस पासपोर्ट, आधार कार्ड तयार करू शकतात ते बोगस लेटर हेड ही बनू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली.

तर काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनीही असाच दावा केला आहे. माझ्या कार्यालयातून शिफारस पत्र देताना नागरिकांची कागदपत्रे तपासली जातात. मालेगावात बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान ओळखपत्रे बनवणारी टोळी कार्यरत असल्याची मी वेळोवळी तक्रार केली आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. मी पोलीस आणि संबंधित यंत्रणांना सर्व मदत करण्यास तयार असल्याचे आसिफ शेख यांनी सांगितले.

त्यामुळे आता ही लेटरहेड या आमदारांनीच दिली होती की ती बनावट आहेत, याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांना दोन्ही एजंटसच्या झाडाझडतीत 155 आधार कार्ड, 34 पासपोर्ट, 28 पॅन कार्ड, 8 रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, 187 बँक आणि पोस्टाचे पास बुक, 19 रबर स्टॅम्प आणि 29 शाळा सोडल्याचे दाखले सापडले आहेत.

(Mumbai Police arrested two Bangladeshi citizens)