दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या

Mumbai Police : मुंबई, वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील ४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींना मालवणी परिसरातून अटक करण्यात आली आहे. यामध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या
मुंबई पोलीस
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 12, 2025 | 2:29 PM

मुंबई, वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील ४ आरोपींना अटक केली आहे. दीड महिन्याच्या मुलाचे ५ लाख रुपयांना विक्री करण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आले होते.

दहा दिवसांपूर्वी झाले होते अपहरण

२ मार्च रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास, मुंबई गोरेगाव पूर्व वनराई पोलिस स्टेशनच्या हद्दीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील बस स्टँडजवळ खेळणी विकणार्‍या एका गुजराती कुटुंबातील १.५ महिन्यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. वनराई पोलिसांनी मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांना कठोर परिश्रम करावे लागले.

पोलिसांच्या सहा पथकांचे परिश्रम

झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण झोनच्या ६ पोलिस पथके तयार करण्यात आली. पथकाने वेगवेगळ्या कोनातून तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी सुमारे ११ हजार ऑटो रिक्षा तपासल्या, ज्यामध्ये पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक ऑटो रिक्षाचालक संशयाच्या भोवऱ्यात आला. घटनास्थळावरून मालाड मालवणीच्या दिशेने एका ऑटो रिक्षाची माहिती मिळाली. पोलिस ऑटो चालकापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी ऑटो चालकाच्या घरात एका लहान बाळाचा जन्म झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

असा रचला कट

तपासात असे आढळून आले की आरोपी राजू मोरेला दोन बायका आहेत, पहिली मंगल मोरे आणि दुसरी फातिमा शेख अशा आहेत. मंगल मोरेला मूल नाही. त्यालाअनेक वर्षांपासून मूल होत नव्हते. राजूची पत्नी त्याला मूल दत्तक घेण्याचा आग्रह करत होती. पण मूल दत्तक घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील, म्हणून आरोपी राजूने रस्त्याच्या कडेला एक मूल चोरण्याचा कट रचला.

आरोपी राजू मोरेची दुसरी पत्नी फातिमा शेख हिने चोरीला गेलेल्या मुलासाठी ५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बाळ चोरण्यापूर्वी, आरोपी राजू मोरेने वनराई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील गुन्ह्याच्या ठिकाणाची ३ दिवस रेकी केली होती, त्यानंतर त्याने बाळ चोरण्याचा कट रचला आणि कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना ऑटो रिक्षाच्या मदतीने बाळ चोरून पळून गेला. पीडितेचे कुटुंब गुजरातचे आहे आणि रमजान महिन्यात खेळणी आणि फुगे विकण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचा 1.5 महिन्यांचा मुलगा त्याच्या आईसोबत झोपला होता.