
मुंबईत गेल्या चार ते पाच तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईची लाईफलाईन मानली जाणाऱ्या मुंबई लोकलचा मोठा खोळंबा झाला आहे. सध्या माटुंगा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. यामुळे अनेक गाड्या, दुचाकी या पाण्यात अडकल्याने बंद पडल्या आहेत. आता नुकतंच मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका नियंत्रण कक्षाला भेट देत मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाला अनेक सूचना केल्या आहेत.
आशिष शेलार यांनी महापालिकेतील नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत पावसामुळे सध्या शहराची काय स्थिती आहे, याबद्दल सांगितले आहे. मी मुंबईतील पूरस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात माहिती घेतली. या बैठकीत, त्यांनी सीसीटीव्ही आधारे शहराच्या विविध भागांतील परिस्थितीचे थेट आकलन केले. तसेच, मुंबईच्या प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी, अग्निशमन दलाकडून करण्यात आलेले उपाय, शाळा-महाविद्यालयांची स्थिती, रेल्वे वाहतुकीवरील परिणाम आणि सखल व उंच भागांमधील पाणी साचण्याच्या स्थितीची माहिती घेतली. या सर्व बाबींचा अभ्यास करून, अशा नैसर्गिक आपत्त्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देत असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
मुंबई महापालिका, पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, ट्राफिक पोलीस यांच्याशी बोललो. त्यासोबत सर्व ठिकाणी महापालिका असो पोलीस असो नियंत्रणा असो हे ऑनसाईट जागेवर आहेत. लोकल उशिराने धावत आहेत. अद्याप पूर्ण बंद पडलेल्या नाहीत. त्या पूर्ण बंद पडू नये यासाठी चोख व्यवस्था करावी, अशी सूचना आशिष शेलार यांनी दिली. तसेच दादर, कुर्ला, सीएसएमटी, सायन या ठिकाणी जर प्रवाशी संख्या वाढली तर बेस्टची व्यवस्था करणे याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील दुपारच्या सत्राच्या शाळा आणि कॉलेजला सुट्टी दिली आहे. सकाळच्या सत्रातील शाळेतील जे विद्यार्थी, शिक्षक शाळेत गेले असतील त्यांना सुखरुप घरी जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कामाला लागावं, अशी सूचना दिली आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
मुंबईतील गांधी मार्केट, वडाळा, सायन, हिंदमाता या ठिकाणी पाणी साचलं आहे. त्याचा निचरा करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी फांद्या आणि काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे जर रस्ता किंवा फुटपाथ अडथळा निर्माण झालं असेल तर लगेचच ते काढून टाकण्यास सांगितले आहे. नेपियन्सी रोडवर एक भिंत कोसळल्याने नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. त्याबद्दलचीही माहिती घेत आहोत. तसेच सखल भागात जिथे पाणी साचलंय तिथे पंपिग स्टेशन सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज आणि उद्या दोन दिवस अलर्ट आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहनही आशिष शेलार यांनी केले.