मुंबईत पावसाचा कहर, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली; लोकलची सद्यस्थिती काय?

मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या २५ मिनिटे किंवा त्याहूनही जास्त वेळाने उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

मुंबईत पावसाचा कहर, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली; लोकलची सद्यस्थिती काय?
प्रातिनिधिक छायाचित्र
Updated on: Aug 19, 2025 | 9:48 AM

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारसह रायगड आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळीत झाली आहे. सध्या कल्याण, दादर आणि ठाणे यांसारख्या प्रमुख स्थानकांवरील रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मध्य रेल्वेची स्थिती काय?

मुंबई आणि ठाणे परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळीत झाली आहे. तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकलला याचा मोठा फटका बसला आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले होते. आजही अनेकांचे हाल होण्याची शक्यता आहे. पावसाच्या संततधारेमुळे लोकल उशिरा धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सध्या कल्याण, ठाणे आणि दादरसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे अनेक चाकरमान्यांनी आज घरीच राहून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी नेहमीपेक्षा कमी असली तरी, कामावर निघालेल्या प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेची स्थिती काय?

मुंबईसह उपनगरात कोसळत असलेल्या मुंबईतील तिन्ही लोकल मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर पावसाचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर देखील काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांचा वेग कमी झाला आहे. यामुळे चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्रवास करण्याआधी रेल्वेची अपडेट जाणून घ्या, अशी माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

हार्बर रेल्वेची स्थिती काय?

मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. तर काही लोकल गाड्या या अर्धा तास उशिराने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर यांसारख्या सखल भागांमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबई लोकलची वाहतूक संथ झाली आहे. या विस्कळीत सेवेमुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रवासी स्थानकांवर गाड्यांची वाट पाहत थांबले आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या सद्यस्थिती जाणून घ्या, असे आवाहन केले आहे.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांनी आज घरूनच वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी नेहमीपेक्षा कमी दिसत आहे. तरीही कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना कोणताही महत्त्वाचा प्रवास करण्याआधी रेल्वेच्या स्थितीची माहिती घ्या, असे आवाहन केले आहे.