मुंबईत मे महिन्यात शतकातला सर्वात मोठा पाऊस,107 वर्षांतला रेकॉर्ड ब्रेक

मुंबई आणि उपनगरांना काल रात्रीपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसाने मुंबईतील रस्ते कामांमुळे आधीच अडचणीत असलेल्या मुंबईकरांची अवस्था खिंडीत सापडल्या सारखी झाली आहे.

मुंबईत मे महिन्यात शतकातला सर्वात मोठा पाऊस,107 वर्षांतला रेकॉर्ड ब्रेक
| Updated on: May 26, 2025 | 4:26 PM

मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर आता उद्या २७ मेला मुंबई आणखी मोठा पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई,ठाणे आणि रेड अलर्ट दिल्याने उद्या आणि परवा मोठा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मोसमी पाऊस वेळे आधीच आल्याने मुंबईतील सर्व सखल भागात पाणी शिरले आहे. या पावसाने मुंबईतील सखल भागासह मेट्रो तीन आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. दरम्यान, आयएमडीने मे महिन्यात मुंबईत शतकातील सर्वाधिक पाऊस पडल्याचे म्हटले आहे. गेल्या १०७ वर्षातला मे महिन्यातला सर्वाधिक पाऊस मुंबई अनुभवत आहे.

मुंबईच्या इतिहासातील २६ मे रोजी पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. शहरात मे महिन्यात इतका जास्त पाऊस शंभर वर्षांपूर्वी पडला होता. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे १३५ मिमी पाऊस २४ तासांत पडला आहे. सध्याच्या ढगांची स्थिती पाहाता. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे आयएमडीच्या संचालक शुभांगी भुते यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

येथे पोस्ट पाहा –

नालेसफाईवर पावसाचे पाणी फेरले


मुंबईत कालरात्रीपासून सुरु झालेला पाऊस थांबण्याचे काही नाव घेत नाहीए…दर दोन तासांनी मुंबईत पुन्हा अंधारुन येत पाऊस कोसळत आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन-किंग्जसर्कल, अंधेरी सबवे, मिलन सबवे पाण्याखाली गेले आहेत. मध्य रेल्वेती लोकल व्यवस्था ठप्प झाली आहे. तर मेट्रो तीनचे व्यवस्थापनही वरळीतील आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरल्याने बंद करण्यात आले आहे. या जोरदार पावसाने मुंबईतील जनजीवन व्यस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांवर कामे सुरु असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नुकतेच केलेल्या नालेसफाईचा गाळ हा नाले आणि गटारांच्या किनाऱ्यांवरच रचून ठेवल्याने तो पुन्हा नाल्यांमध्ये वाहून गेला आहे. त्यामुळे नालेसफाईवरही पावसाचे पाणी फेरले आहे.