
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र अद्याप मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जर आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे. तर ती मेहरबानी नाही. एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल. नाहीतर महाराष्ट्र पेटेल, असं संजय राऊत म्हणालेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलंय.
सरकारला आरक्षण द्यावंच लागणार आहे. नाहीतर जनता भडकेल. भारतीय जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोटा शपथ घेण्याचे काम शिंदे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी गद्दारी केली. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं हे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्कम महाराष्ट्राला तडा देण्याचं काम हे करत आहेत. शिंदे भारतीय जनता पक्षाच्या इशारा वरती चालत आहेत. यांचा स्वतःचा आचार-विचार काहीही राहिलेला नाही. जे भाजप सांगतं तेच ते करत आहेत. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार असं शिंदे म्हणाले होते. ते आता शिवसेनेत राहिलेत का? जनता पक्ष आमच्यावरती छळ करते त्यामुळे जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसणारे हे… आता शिवरायांची शपथ घेत आहेत. मात्र आता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवरायांची शपथ कसली घेताय? शिंदेंनी बाळासाहेबांशी गद्दारी केली. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर अख्खी फौज उभी केली. त्या बाळासाहेबांशी तुम्ही गद्दारी केली अन् आता शिवरायांची शपथ घेताय?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.