
मुंबई | 04 ऑक्टोबर 2023, गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : नांदेडमध्ये 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी 7 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारने याची जबाबदारी स्विकारावी. मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. अशात आता शिंदे गटातील आमदाराची प्रतिक्रिया आली आहे. या घटनेला प्रशासनातील लोक जबाबदार आहेत, असं त्यांनी म्हटलंय. तसंच या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
नांदेडमध्ये जे काय घडलं. नागपूरमध्ये जे काही घडलं. औषधांचा तुटवडा जाणवतोय. यासाठी सर्वस्वी शासनाचेच लोक जबाबदार आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. त्यांना स्वतः जाऊन भेटणार आहे, असं शिवसेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दवाखान्यांमध्ये औषधं नसतात. पण बाहेर जे मेडिकल शॉप आहे. त्यांच्याकडे औषधांचा पुरवठा असतो. त्यामुळे हे एक रॅकेट चालवलं जातंय. असं आमचं स्पष्ट मत आहे. हापकिन या सगळ्यांना औषध पुरवठा करतं. पण मग औषध पुरवठा का होत नाही? यांच्यामध्ये दलाल नेमके कोण कोण आहेत? या सगळ्यांचा शोध घेतला पाहिजे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि सीआयडी चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेलेत. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर देखील अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट विस्ताराला आता विलंब होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं संजय शिरसाट म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होत आहे. त्यावर अजितदादांना वारंवार टार्गेट का केलं जात आहे? हा आमचा प्रश्न आहे. अजित दादा आजारी होते. त्यांना बोलता येत नव्हतं. म्हणून ते कॅबिनेट बैठकीला आले नव्हते. ते कणखर नेते आहेत. ते नाराज वगैरे नाहीत, असं शिरसाट म्हणाले. शिवाय आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच व्हावा, अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले.