Mumbai: पश्चिम रेल्वेला फायदेशीर ठरणारं पंधरा डब्ब्यांच्या लोकलचं धोरण मध्य रेल्वेत का रखडलंय? वाचा…

| Updated on: Jun 25, 2022 | 8:17 AM

मध्य रेल्वेला मात्र आतापर्यंत पंधरा डब्यांच्या फक्त 22 फेऱ्या चालविण्यात यश आलंय.

Mumbai: पश्चिम रेल्वेला फायदेशीर ठरणारं पंधरा डब्ब्यांच्या लोकलचं धोरण मध्य रेल्वेत का रखडलंय? वाचा...
पश्चिम रेल्वेला फायदेशीर ठरणारं पंधरा डब्ब्यांच्या लोकलचं धोरण मध्य रेल्वेत का रखडलं जातंय?
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: लोकलला (Local) होणारी गर्दी पाहून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने कल्याणच्या पुढे पंधरा डब्याच्या लोकलची योजना आखली होती ती आता चांगलीच रखडलीये. मध्य रेल्वेचा (Central Railway) कल्याणच्या पुढे कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते आसनगाव-कसारा तिसरा आणि चौथा मार्ग रखडलाय याच कारणामुळे पंधरा डब्यांच्या फेऱ्या वाढविणे अशक्य असल्याचं म्हटलं जातंय. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) पंधरा डब्यांच्या तब्बल 79 फेऱ्या होतायत. मध्य रेल्वेला मात्र आतापर्यंत पंधरा डब्यांच्या फक्त 22 फेऱ्या चालविण्यात यश आलंय.

ही योजना रखडण्याचं कारण काय? (कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्ग)

  • एमयूटीपी-3 अंतर्गत कल्याण ते कसारा ही 67.62 कि. मी. चा तिसऱ्या मार्गिकेचा प्रकल्प वर्ष 2011-12 मध्ये मंजूर करण्यात आला होता. 67 कि.मी. पैकी 48 कि.मी.चा टप्पा जमीन संपादन न झाल्याने रखडला आहे.
  • या मार्गिकसाठी एकूण 36.63 हेक्टर जमिनीची गरज असून त्यापैकी 18.30 हेक्टर जमीन खासगी, 4.75 हेक्टर जमीन सरकारी तर 13.56 हेक्टर जमीन वन विभागाची आहे. आतापर्यंत 36.63 हेक्टरपैकी केवळ 7.94 हेक्टर जमीनच ताब्यात आली.
  • उर्वरित जमिनीसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय पंचायतीराज मंत्री कपिल पाटील यांच्यासोबत महसूल अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.

कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग

  • एमयूटीपी-३ (अ) नुसार कल्याण ते आसनगाव चौथ्या मार्गिकेचा प्रकल्प 1 एप्रिल 2019 रोजी मंजूर झाला असून 32.42 कि.मी.चा मार्ग बांधण्यासाठी 1769.16 कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकार विभागून करणार आहे.
  • स्टेशन बिल्डिंग, प्लॅटफॉर्म विस्तारीकरण, उड्डाणपूल, पादचारी पूल आणि इतर कामांसाठी 254.91 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका

  • एकूण लांबी 67.62 कि.मी.
  • मंजुरीचे वर्ष 2011-12
  • मंजूर खर्च 792.89 कोटी
  • अंदाजित खर्च 1387.52 कोटी

डेडलाइन टळण्याची शक्यता

  • कल्याण ते आसनगाव मार्च 2024
  • आसनगाव ते कसारा मार्च 2025
  • पंधरा डब्यात 25 टक्के जादा प्रवासी मावतात.
  • पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांची लोकल 2009 रोजी सुरू
  • मध्य रेल्वेचा पहिला पंधरा डबा २०१२ रोजी धावला
  • मध्य रेल्वेचा दुसरा पंधरा डबा 3 मार्च 2019 रोजी सुरू
  • सध्या प.रे. वर 15 डब्यांच्या 79 फेऱ्या होत आहेत.
  • सध्या म.रे. वर 15 डब्यांच्या 22 फेऱ्या होत आहेत.

पार्क करायला पुरेशी जागा नाही

  • मध्य रेल्वेवर दक्षिण मुंबईत दोन स्थानकांमधील अंतर कमी असल्याने तसेच पुरेशी जागा नसल्याने पंधरा डब्यांच्या लोकल चालवणे आणि त्या रात्रीच्या पार्क करण्याचं काम कठीण बनलंय.
  • कल्याण ते आसनगाव- कसारा आणि कल्याण ते बदलापूर हे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कल्याणच्या पुढील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पंधरा डबा चालविणे अशक्य.

नियोजन जमिनीअभावी बारगळले

पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरारदरम्यान धिम्या मार्गावरही पंधरा डब्यांच्या लोकल अलीकडे सुरू केल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि अंधेरी ते विरार पंधरा डब्यांच्या 79 फेऱ्या होत आहेत. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरच्या गर्दीमधून प्रवाशांची काही प्रमाणात तरी सुटका होत आहे. एकीकडे पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याचे पश्चिम रेल्वेचे धोरण खूपच फायदेशीर ठरत असताना मध्य रेल्वेचे पंधरा डब्यांचे नियोजन मात्र जमिनीअभावी बारगळले आहे.