मुंबईकरांना मिळणार दिलासा, एसी लोकलचे भाडे कमी होण्याची शक्यता

| Updated on: Apr 29, 2022 | 1:23 PM

मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एसी लोकलचे भाडे कमी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून, लवकरच याबाबत मोठी घोषणा होऊ शकते.

मुंबईकरांना मिळणार दिलासा, एसी लोकलचे भाडे कमी होण्याची शक्यता
एसी लोकलचा प्रवास स्वस्त
Follow us on

मुंबई : एकीकडे राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) आल्याचे पहायला मिळत आहे. राज्याच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मुंबईमध्ये देखील उकाडा प्रंचड वाढला आहे. मात्र दुसरीकडे मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार लवकरच एसी लोकलच्या (AC Local) दरात कपात होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एसी लोकलचा प्रवास (Travel) स्वस्त होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतो. एसीच्या तिकीटाचे दर जवळपास 20 ते 30 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज एका कार्यक्रमानिमित्त भायखळा रेल्वे स्टेशनला भेट देणार आहेत. या कार्यक्रमात एसी लोकलच्या तिकिट दरात कपात करण्यात आल्याची घोषणा होऊ शकते. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून लोकलची ओळख आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने काही एसी लोकल देखील चालवण्यात येतात. मात्र या लोकलचे तिकीट दर सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशी संख्या वाढावी यासाठी तिकीट दर कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न

मुंबईकरांची लाईफलाईन अशी लोकलची ओळख आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वतीने काही एसी लोकल देखील प्रवाशांच्या सेवेत सादर करण्यात आल्या आहेत. मात्र या एसी लोकलचे भाडे जास्त असल्याने रेल्वे प्रशासनाच्या अपेक्षेप्रमाणे एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. प्रवाशांचा प्रतिसाद कमी का मिळत आहे यासाठी रेल्वेच्या वतीने प्रवाशांचे सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रवाशांनी एसी लोकलचे तिकिट दर कमी करण्याची मागणी केली होती. तसेच विविध प्रवासी संघटनांकडून देखील अनेक दिवसांपासून एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्यात यावेत अशी मागणी करतण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता तिकीटाच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

20 ते 30 टक्के कपातीची शक्यता

एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा याकरता एसी लोकलच्या दरात 20 ते 30 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. आज रावसाहेब दानवे हे भायखळा रेल्वे स्थानकाला भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा होऊ शकते. तसेच झाल्यास हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.