मुलीकडून पक्षाचाच निषेध, ट्विट व्हायरल होताच जितेंद्र आव्हाड मीडियासमोर, म्हणाले, दॅट्स ऑल, मॅटर एंड!

नताशा आव्हाड यांच्या डिलिमिटेशन विधेयकावरील ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पक्षाचा संभाव्य पाठिंबा नाकारत नताशाने तीव्र निषेध नोंदवला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत, मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करत, पवारांवरील निष्ठेचा पुनरुच्चार केला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचाच निर्णय अंतिम असेल, असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मुलीकडून पक्षाचाच निषेध, ट्विट व्हायरल होताच जितेंद्र आव्हाड मीडियासमोर, म्हणाले, दॅट्स ऑल, मॅटर एंड!
jitendra awhad
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 12:32 PM

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी डीलिमिटेशन विधेयकावरून पक्षालाच घरचा आहेर दाखवला आहे. माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते, असं ट्विट नताशा यांनी केलं आहे. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. लेकीचं ट्विट येताच जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नताशाला काही गोष्टी समजत नाहीत. पण तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिला बोलण्याचा अधिकार आहे, असं सांगतानाच शरद पवार आणि सुप्रिया सुळे या डीलिमिटेशनबाबत जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. सुप्रिया सुळे या विषयावर बोलल्या आहेत. त्यामुळे पुढे काही बोलण्याची गरज नाही. दॅट्स ऑल. मॅटर एंड, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

माझ्यावर, आमच्या कुटुंबावर आणि पर्यायाने माझ्या मुलीवर शरद पवारांचे मोठे उपकार आहेत. या जन्मात त्याची परतफेड करता येणार नाही. हे मला समजतं. कदाचित माझ्या मुलीला समजत नसेल. तिला बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार लोकशाहीवादी आहेत. तुझ्या पोरीला चूप बसव वगैरे असं ते मला बोलणारे नाहीत. उलट तिला बोलायचं बोलू दे. तिच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ देऊ नको, असंच शरद पवार म्हणतील. साहेबांचा स्वभाव मला माहीत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Loading...

पवारच माझी सत्ता

माझ्या मुलीचा काय अँगल आहे? ती का वाचते? आता ती बोलली, ते बोलली. ते खोडलं जाऊ शकत नाही. एकदा मी दैव जाणिले कुणी… हे गाणं ऐकत होतो. हे गाणं सर्च करताना तेच स्टेट्सला गेलं. लगेच मी पुसूनही टाकलं, असं सांगतानाच माझी सत्ता ही शरद पवार आहेत, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

 

पवारांवर 100 पानं लिहू शकतो

मी 40 वर्ष शरद पवारांना अनुभवलं आहे. मी अनेकांच्या अंगावर गेलो. पवारांच्या जवळच्या लोकांच्या विरोधात गेलो होतो. मी रामनाथ गोयंकांचा पेपर जाळला होता. पवारांनी मला विचारलं तेव्हा मी कारण सांगितलं. ते योग्यच केलं म्हणाले होते. अभिव्यक्ती आणि शरद पवार यांच्यावर मी शंभर पानं लिहू शकतो. मी अनेक अशा गोष्टी केल्या ज्या पवारांना पटणार नाहीत असं लोकांना वाटलं होतं. पण पवारांनी त्यावर कधी आक्षेप घेतला नाही, असं त्यांनी सांगितलं.

वरचे निर्णय मी घेत नाही

डिलिमिटेशनवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एकदा शरद पवार बोलले, बोलले. सुप्रिया ताई आमच्या नेत्या आहेत. सुप्रिया ताई बोलल्या म्हणजे दॅट्स ऑल. मॅटर एंड. मी खासदार नाही. वरचे निर्णय मी घेणार नाही. पक्षाचे खासदार, सुप्रियाताई आणि शरद पवार वगैरे नेते हेच डीलिमिटेशनवर बोलतील. अशा मोठ्या प्रश्नावर माझ्यासारख्या छोट्या आमदारानं बोलणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विलिनीकरणाच्या चर्चेत नव्हतो

मी विलिनीकरणाच्या चर्चेत नव्हतो. अजितदादांसोबत नव्हतो आणि आमच्या पक्षाकडूनही या चर्चेत नव्हतो. त्यामुळे मला याची काही माहिती नाही. तुम्ही त्याबद्दल मला विचारू नका, असं विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us