
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची ईडीची चौकशी झाली. तब्बल बारा तास सुरु असलेल्या मॅरेथॉन चौकशीनंतर रोहित पवार यांना पुढील तारीख देण्यात आलीये. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणात ईडीची चौकशी सुरू आहे. रोहित पवार चौकशी संपल्यावर ईडी कार्यालयाच्या बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. इतकंच नाहीतर रोहित पवारांना खांद्यावर उचलून घेतलं त्यानंतर पवारांनी भाषण करत आपली प्रतिक्रिया दिली.
आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे. आपला जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे त्यामुळे हा विचारांचा वारसा जपण्यासाठी सर्वांची संघर्षाची भूमिक आहे का असा सवाल रोहित पवारांनी केला. आज बारा तास चौकशी झाली असली तरी परत 1 तारखेला बोलावलं आहे. एक तारखेला आणखी माहिती द्यायला सांगितली आहे. मी व्यवसायामध्ये आधी आलो मग राजकारणात आलो. प्रामाणिकपणे व्यवसाय केला. काही लोक आधी राजकारणात आले आणि नंतर सहजपणे व्यवसाय केला. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा असा माझा त्यांना प्रश्न असल्याचं रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर कधी झुकत नाही आणि झुकणारही नाही. शरद पवार युवकांना संधी देतात आणि अडचणीत असताना साथ देतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे आपण देत आहोत. एक तारखेला चौकशीसाठी बोलावलं आहे. आपली लढाई सुरुच राहणार आहे. चौकशी सुरू असताना काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे फोन आल्याचं सांगत रोहित पवारांनी सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, जेव्हा एखादा आपल्या विचाराचा आमदार अडचणीत येतो तेव्हा आपल्या सर्वांचा लाडका नेता पवार साहेब इथे आले आणि बारा तास बसले. याच्यावरून एक गोष्ट समजून घ्या पवार साहेब युवा नेत्याला संधी देतात आणि तो जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याच्या पाठिशी बाप माणसासारखे भक्कमपणे उभे राहतात. साहेबांना लढणारी माणसं आवडतात. मराठी माणसं कायम लढतात, पवारांना पळणारी नाहीतर लढणारी माणसं आवडतात. पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्याच्या मागे शरद पवार थांबत असल्याचं रोहित पवार म्हणाले.