रोहित पवारांच्या ‘त्या’ मागणीला मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी

| Updated on: Jan 08, 2020 | 9:54 AM

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेत रोहित पवारांनी शिक्षण सेवक पदासाठी पात्र 280 उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी केली

रोहित पवारांच्या त्या मागणीला मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी
Follow us on

मुंबई : शिवसेना आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही बीएमसीच्या कामकाजात लक्ष (Rohit Pawar in BMC) घालण्यास सुरुवात केली आहे. रोहित पवारांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण सेवक पदासाठी निवड झालेल्या 280 पात्र उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

मुंबई महापालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी 280 शिक्षण सेवक पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या 280 उमेदवारांची निवड सप्टेंबर 2019 मध्ये समुपदेशानासाठी झाली होती. त्यानंतर 3 डिसेंबर 2019 रोजी पुन्हा एकदा शिक्षण विभागाने निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.

त्यानंतरही महापालिकेने नियुक्तीचे आदेश न आल्यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अखेर, महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेत मंगळवारी रोहित पवारांनी या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी केली. यावेळी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधवही उपस्थित होत्या.

आयुक्तांनी शिक्षकांच्या नियुक्तीची फाईल मंजूर केल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 280 उमेदवारांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली. लवकरच सर्व जण सेवेत रुजू होतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी बोलून दाखवला.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी संसदीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच महापालिकेच्या कारभारात लक्ष देण्यास सुरुवात केली होती. ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीसोबतच लाँचिंग झालेली पवारांची तिसरी पिढीही मुंबईतील राजकारणात सहभागी होईल, अशी चर्चा सुरु होती. अखेर शिक्षकांच्या मुद्दयाद्वारे रोहित पवारांनी मुंबई महापालिकेच्या कामकाजात (Rohit Pawar in BMC) लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचं दिसलं.