लॉकडाऊनच्या भीतीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना – रोहित पवार

| Updated on: Mar 14, 2021 | 9:56 PM

बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनच्या या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांकडून विरोध होताना दिसतोय. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याचं म्हटलंय.

लॉकडाऊनच्या भीतीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना - रोहित पवार
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासन अंशत: लॉकडाऊनचा विचार करत आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तर कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनच्या या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांकडून विरोध होताना दिसतोय. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याचं म्हटलंय.(Rohit Pawar’s tweet regarding lockdown, appeals to citizens to follow the rules)

रोहित पवार यांनी लॉकडाऊनबाबत एक ट्वीट केलं आहे. ‘लॉकडाऊनच्या भितीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी #lockdown पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबध्दपणे नियमांचे पालन करणं गरजेचंय, लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाहीये,असं मला वाटतं’, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

आपल्या ट्वीटमधून रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाला थेट विरोध केला नसला तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्व घटक म्हणजे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये संभ्रमाची भावना असल्याचं म्हटलंय. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीच आता काटेकोरपणे नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणालेत. तसंच लॉकडाऊन राज्यासह सर्वसामान्य जनतेलाही पूरक ठरणार नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढ

राज्यात कोरोनाचा हाहा:कार माजलाय. राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे (Maharashtra Corona Update). या शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे. हा आकडा आणखी वाढण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेने सावध होणं जास्त जरुरीचं आहे. अन्यथा परिस्थिती जास्त भीषण होत जाईल. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या भयानक गोष्टींना पुन्हा तोंड देण्याची पाळी आपल्यावर ओढवण्याची शक्यता आहे.

नागपुरात कोरोनाची भीषण परिस्थिती

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात नागपुरात तब्बल 2252 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 12 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झालाय. नागपुरात आतापर्यंत 173547 जणांना कोरोनाची लागण झालीय. यापैकी 152959 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 16964 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत 3584 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झालाय.

पुण्यातही आकडा वाढताच

पुण्यात दिवसभरात 1740 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. पुण्यात दिवसभरात 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4952 रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 355 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सध्या 11590 रुग्ण सक्रीय आहेत.

संबंधित बातम्या :

Latur corona update | कोरोना रुग्ण वाढल्यामुळे लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी, जाणून घ्या काय सुरु?, काय बंद?

Pune corona update | पुण्यात मृतांचा आकडा 5 हजाराच्या उंबरठ्यावर, रोज हजारो रुग्णांची नोंद, वाचा नेमकी स्थिती काय?

Rohit Pawar’s tweet regarding lockdown, appeals to citizens to follow the rules