गेट वे, मरीन ड्राईव्हला 5 पेक्षा जास्त लोकांना बंदी, रात्री 11 नंतर हॉटेल बंद; गृहमंत्र्यांचं नियमांकडे बोट

| Updated on: Dec 30, 2020 | 12:26 PM

तुम्ही न्यू ईयर सेलिब्रेशन करण्याचा बेत आखत असाल किंवा त्याची तयारी पूर्ण केली असेल तर थोडं सबूर धरा. (New Year celebrations: maharashtra imposes fresh curbs)

गेट वे, मरीन ड्राईव्हला 5 पेक्षा जास्त लोकांना बंदी, रात्री 11 नंतर हॉटेल बंद; गृहमंत्र्यांचं नियमांकडे बोट
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र
Follow us on

मुंबई: तुम्ही न्यू ईयर सेलिब्रेशन करण्याचा बेत आखत असाल किंवा त्याची तयारी पूर्ण केली असेल तर थोडं सबूर धरा. कारण गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हवर 5 पेक्षा अधिक लोकांना जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच रात्री 11 नंतर हॉटेल, पब, बार बंद राहणार असून राज्यात सर्वांना संचारबंदीच्या नियमांचं पालनही करावं लागणार आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच सरकारी नियमांकडे बोट दाखवल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. (New Year celebrations: maharashtra imposes fresh curbs)

अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाचं संकट अजूनही उभं आहे. हे लक्षात ठेवून नवीन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने आणि शांततेत साजरं करावं. 11 वाजता हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट बंद राहतील, असं सांगत देशमुख यांनी कोरोना नियमांकडे बोट दाखवलं.

रात्री 11 नातेवाईकांकडे जाऊ शकता, पण…

रात्री 11 नंतर हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही, असं नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे जायचं असेल तर रात्री 11 नंतर जाऊ शकता. फक्त सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं व्यवस्थित पालन करावं. हिल स्टेशनला गर्दी होतेय, ही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

गेट वे, मरीन ड्राईव्हवर मज्जाव

मुंबईत दरवर्षी थर्टीफर्स्टला ज्या ठिकाणी गर्दी होते, त्याबाबत सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह यासारख्या ठिकाणीही ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.

सरकार पाडण्याची कुणामध्येही ताकद नाही

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकार अभेद्य आहे. हे सरकार पाडण्याची कुणातही ताकद नाही, असं सांगतानाच तीन पक्षाचं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असून हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ईडीचा वापर चुकीचा

भाजप विरोधात बोलणाऱ्यांना ईडीची नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. हे सुडाचं राजकारण असून ईडीचा अशा राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही. अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण भारतात कुणीही पाहिलं नव्हतं. भाजप हे राजकारण करतं ही गंभीर बाब आहे, असंही ते म्हणाले. भाजप विरोधात बोलणाऱ्यांविरोधात सीबीआयचा वापर केला जात होता. त्यामुळे आम्ही सीबीआयला राज्यात येण्यापासून अटकाव केला. राज्याची परवानगी घेतल्याशिवाय सीबीआय महाराष्ट्रात येऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकार काहीही करू शकत नाही, असं सांगतानाच सीबीआयला अटकाव केल्यानेच ईडीचा राजकारणासाठी वापर होत असल्याची टीका त्यांनी केली. (New Year celebrations: maharashtra imposes fresh curbs)

 

संबंधित बातम्या:

न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर

जेव्हा सुनेत्रा अजित पवार गातात… लाख मना ले दुनिया… साथ न ये छुटेगा

31 डिसेंबरलाही साई मंदिर खुलं राहणार, साई संस्थानचा निर्णय

(New Year celebrations: maharashtra imposes fresh curbs)