Payal Tadvi suicide case : पायलच्या आठवणीने तडवी कुटुंबाने हंबरडा फोडला

| Updated on: May 28, 2019 | 5:50 PM

मुंबई : “नायर हॉस्पिटल माझी पायल परत देतील का? नायर हॉस्पिटलने 7 दिवसात एकही कॉल केला नाही, माझ्या कुटुंबाशी संवादही साधला नाही. त्या तीन मुलींनी माझ्या पायलचं जगणं मुश्किल केलं होतं, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, असं म्हणत डॉ पायल तडवीची आई आबेदा तडवी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या स्टुडिओतच हंबरडा फोडला. रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॉ पायल […]

Payal Tadvi suicide case : पायलच्या आठवणीने तडवी कुटुंबाने हंबरडा फोडला
Follow us on

मुंबई : “नायर हॉस्पिटल माझी पायल परत देतील का? नायर हॉस्पिटलने 7 दिवसात एकही कॉल केला नाही, माझ्या कुटुंबाशी संवादही साधला नाही. त्या तीन मुलींनी माझ्या पायलचं जगणं मुश्किल केलं होतं, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, असं म्हणत डॉ पायल तडवीची आई आबेदा तडवी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या स्टुडिओतच हंबरडा फोडला.

रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॉ पायल पडवीच्या संपूर्ण कुटुंबाची वेदना टीव्ही 9 ने जाणून घेत, निर्ढावलेल्या नायर प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लाडक्या पायलच्या आठवणीने आईला रडू कोसळलं. “पायलने खूप त्रास सहन केला, तिला आई-भावासाठी उभं राहायचं होतं, पण त्या मुलींनी तिला यातना दिल्या,” अशी आगतिकता पायलची आई आबेदा तडवी यांनी मांडली.

आरोपी तिन्ही महिला पायलच्या रुमच्या बाहेर होत्या, त्यांनीच पायलची बॉडी खाली उतरवली, त्या सर्वात आधी कशा पोहोचल्या? पायलने सुसाईड नोट लिहली असेल तर या नष्ट करु शकतील, पायल असं करु शकत नाही, ही आत्महत्या नाही, हत्या आहे, असा आरोप पायलचे पती डॉ सलीम यांनी केला.

“मला टॉर्चर करतात, त्रास देतात हे पायल सांगत होती, त्या मुली बाथरुमला जाऊन आल्यावर पायलच्या अंथरुणाला पाय पुसायच्या, पायलचं हे ऐकून मी आईला सांगत होतो, तिला घरी घेऊन ये,” असं पायलच्या भावाने सांगितलं.

तर ‘पायलशी 17 मे रोजी शेवटचं बोलणं झालं, तिने माझ्याकडे तक्रार केली, मी तिला धीर दिला, पण ती हे पाऊल उचलेल, असं वाटलं नव्हतं,’ असं पायलचे वडील म्हणाले.

पायलचं जगणं मुश्किल केलं होतं, आम्ही HOD कडे तक्रार केली, मात्र काहीही झालं नाही. पायल मला सांगायची, आरोपी मुली तिला सतत टोमणे मारायच्या, तुझे सिखने नही देंगे, तुझे जानवरोंका डॉक्टर बनाएंगे, तुझे शरम नही है, असं पायलला बोलायच्या, पायल गेली त्याच दिवशी दुपारी शेवटचं बोलणं झालं, असं पायलची आई म्हणाली.

रॅगिंगमुळे आत्महत्या

मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीने 22 मे रोजी आत्महत्या केली. पायल तडवी असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. पायलवर वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने गळफास घेत आत्महत्या केली. पायलला सतत ती आदिवासी असल्याने हिणवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पायल मूळची जळगावची रहिवासी होती. आदिवासी समाजातील पायल ताडवी एका गरीब घरातून वैद्कीय शिक्षणासाठी मुंबईत आली होती. नुकतेच तिचे लग्नही झाले होते. पण ही सर्व स्वप्न आता एका क्षणात उद्धवस्त झाली आहेत. कारण पायलने नायर रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली.

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीचं व्हॉट्सअॅप चॅट ‘टीव्ही 9’ च्या हाती

आदिवासी असणं हा पायलसाठी अभिशाप ठरला. कारण तिला राखीव कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. यामुळे नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरकडून तिचा वारंवार मानसिक छळ केला जात होता. कँटीनमध्ये तिच्यावर कमेंट करणं, व्हाट्सअॅप ग्रुपवर तिला वाईट वाटेल, असे मेसेज करणे, असा प्रकार तीन महिला सिनिअर डॉक्टर्सकडून करण्यात येत होता. या सगळ्याला कंटाळून पायलने नायर वैदयकीय महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार

आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध अॅट्रोसिटीबरोबर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तीनही डॉक्टर पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

एका डॉक्टरला अटक

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीनपैकी एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी डॉ. भक्ती मेहर हिला पोलिसांनी अटक केली असून सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र अद्याप डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोघीही फरार आहेत. सध्या पोलिस या दोघींचा शोध घेत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

पायल तडवी आत्महत्या – आतापर्यंत काय काय झालं?

22 मे – रॅगिंगमुळे डॉ. पायल तडवीची आत्महत्या
22 मे – रॅगिंग करणाऱ्या महिला डॉक्टर पसार – डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल
25 मे – नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक
25 मे – विद्यार्थ्यांचं आंदोलन, दोषींना शिक्षेची मागणी
26 – पायलचं व्हॉट्सअप चॅट समोर
27 मे – महिला आयोगाकडून दखल
27 मे – आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन डॉक्टरांचे निलंबन, मार्डची कारवाई
27 मे – पायलच्या मूळगावी जळगावात निवेदने
28 मे – पायलच्या कुटुंबीयांचं नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन
28 मे – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन कुटुंबीयांच्या भेटीला
28 मे – तीनपैकी एका डॉक्टरला अटक, डॉ. भक्ती मेहरला पोलिसांकडून अटक
28 मे – प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

संबंधित बातम्या :

डॉ. पायल तडवी आत्महत्या : आतापर्यंत काय काय झालं?

रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची नायर रुग्णालयात आत्महत्या   

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीचं व्हॉट्सअॅप चॅट टीव्ही 9 च्या हाती   

Payal Tadvi suicide case : कुटुंबीय म्हणाले ही तर हत्या, महाजन म्हणाले दोषींना सोडणार नाही!