Mumbai Porsche Accident: कोस्टल रोडवर काळजात धस्सं करणारा अपघात; एका गोष्टीमुळे वाचले चालकाचे प्राण

मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास एका पोर्शे कारचा अपघात झाला. अतिवेगामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घ्या..

Mumbai Porsche Accident: कोस्टल रोडवर काळजात धस्सं करणारा अपघात; एका गोष्टीमुळे वाचले चालकाचे प्राण
कोस्टल रोडवर पोर्शे कारचा अपघात
Image Credit source: Tv9
| Updated on: Jul 19, 2026 | 11:56 AM

मुंबईतील कोस्टल रोडवर आज (रविवार, 19 जुलै 2026) सकाळी 8 वाजताच्या सुमारास एका पोर्शे कारचा अपघात झाला. या अपघातात महागड्या पोर्शे कारचं प्रचंड नुकसान झालं, पण सुदैवाने त्यातील दोन लोकांचे प्राण वाचले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही पोर्शे कार प्रचंड वेगाने कोस्टल रोडवर धावत होती. यादरम्यान चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की या लग्झरी स्पोर्ट्स कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातावेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे त्यातील प्रवाशांचे प्राण वाचू शकले. पोर्शे कारमधील एअरबॅग वेळीच उघडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कार दुभाजकाला धडकताच त्यातील एअरबॅग वेळीच उघडले, यामुळे चालक आणि त्यासोबतच्या प्रवाशाचे प्राण वाचले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला हटवण्याचं कार्य हाती घेतलं. टॅप टर्बो इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे फिल्ड इंचार्ज रवी गुप्ता याविषयी ‘मिड-डे’शी बोलताना म्हणाले, “कोस्टल रोडवर विशेषत: वीकेंडला बेदरकारपणे हाय-स्पीडवर गाडी चालवणं ही सामान्य गोष्ट झाली आहे. वाहनाच्या गतीचे नियम धाब्यावर बसवून रॅश ड्राइव्हिंग केली जाते. त्यातच शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता ओला होता. सध्या घटनास्थळावरून गाडी हटवण्याचं काम सुरू असून आम्ही याप्रकरणी पोलिसांना सहकार्य करत आहोत.”

पहा व्हिडीओ-

अपघात होताच जवळपास आठ मिनिटांत पोलीस आणि बचाव पथकं तिथे पोहोचली होती. पोर्शेमधील दोन्ही प्रवाशांना गाडीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान बचावकार्य सुरू असल्याने अपघातामुळे कोस्टल रोडच्या त्या मार्गावरील वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली होती. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर कार्य केलं आणि अपघातग्रस्त गाडी तिथून हटवली. त्यानंतर ती वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सध्या पोलीस या अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. पोर्शे कारचा अपघात हा त्यातील तांत्रिक बिघाडामुळे झाला की अतिवेगामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, हे शोधून काढण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Follow Us