Water Cut News : मुंबईकरांनो पाणी जरा जपूनच वापरा, निराश करणारी बातमी, धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा
Water Cut News : यंदा एल निनोचा प्रभाव असल्यामुळे सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल असं बोललं जातय. जून महिन्यात सुरुवात तशीच झाली होती. पहिले तीन आठवडे पाऊस पडला नव्हता.

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबईत सध्या पाणी कपात लागू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांत मिळून रविवारी सकाळ पर्यंत 88.70 टक्के पाणीसाठा होता. गेल्या आठवड्यात मुंबईतील या सात धरणातील मिळून पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला होता. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण सध्या हा पाणीसाठा 88 टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे पाणी कपातीची शक्यता कमी झाली आहे. सध्या सुरु असलेली पाणी कपात कायम राहणार आहे. मागच्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे हा पाणीसाठा कमी झाला आहे.
यंदा एल निनोचा प्रभाव असल्यामुळे सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल असं बोललं जातय. जून महिन्यात सुरुवात तशीच झाली होती. पहिले तीन आठवडे पाऊस पडला नव्हता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैचे पहिले दोन आठवडे दमदार पाऊस बरसला. त्यामुळे धरणं भरली. अद्याप पावसाचे दोन महिने बाकी असून या काळात किती पाऊस पडतो यावर पाणीपुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा सात जलाशयांपैकी मुंबईच्या हद्दीत असलेले विहार आणि तुळशी या धरणातील पाणीसाठा हा 90 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पाणी कपात रद्द होणार, अशी आशा निर्माण झाली होती.
पाणीकपात रद्द करण्याची मागणीही होऊ लागली होती. मात्र, गेल्या आठवडाभरात पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठा खालावू लागला आहे. त्यामुळे पाणीकपात पुढचे काही दिवस तरी कायमच राहणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात इतका पाणीसाठा आहे
उर्ध्व वैतरणा – ८०.१४ टक्के
मोडक सागर – ९९.९९ टक्के
तानसा – ९८.७७ टक्के
मध्य वैतरणा – ९०.५५ टक्के
भातसा – ८६.२८ टक्के
विहार – १०० टक्के
तुळशी – ९९.८७ टक्के
एकूण – ८८.७० टक्के
धरणाच्या पाणीसाठ्यात एक टक्का वाढ होते तेव्हा ते पाणी तीन दिवस पुरते.
३० सप्टेंबरपर्यंत जर धरणे १०० टक्के भरली तरच तो पाणीसाठा पुढच्या मे किंवा जूनपर्यंत किंवा पाऊस सुरू होईपर्यंत पुरतो.
यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
त्यामुळे सध्यातरी पाणी कपात मागे घेण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.