Mumbai Ganpati Visarjan : गणपती विसर्जनासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त; ‘या’ रस्त्यांवर वाहतूक बंद, 24 हजार पोलीस तैनात
दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे.

दहा दिवसांचा पाहुणचार आता संपला. लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्याची वेळ आली. गेले दहा दिवस संपूर्ण मुंबईत चैतन्याचा महासागर उसळला होता. सकाळ-संध्याकाळच्या आरत्यांचा नाद. मोदकांचा दरवळणारा गोड सुवास. भक्तांची रात्रंदिवस चाललेली मनोभावे सेवा. बाप्पावरचं हे अथांग प्रेम शब्दांत सांगणं कठीण आहे. गल्लोगल्ली ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष घुमत होता. लालबागच्या राजासारखे मुंबईतील मोठे गणपती असोत, वा एखाद्या चाळीतील छोटे गणपती, प्रत्येकाचा थाट वेगळा पण भक्ती एकच असते.
वाहतूक पोलिसांकडून चोख व्यवस्थेचं नियोजन
गेले दहा दिवस मुंबई कधी झोपलीच नाही. आता निरोपाच्या वेळीही ती अशीच जागी राहील. 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपला बाप्पा आपल्या गावी परत जाईल. या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल. भक्तांच्या या अलोट गर्दीत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. 25 सप्टेंबर दुपारी 12 ते 26 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल असतील. वाहनचालकांनी उत्तर-दक्षिण मुंबई प्रवासासाठी प्रामुख्याने कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हे रस्ते मिरवणुकांमुळे वाहतुकीस बंद
कुलाबा, मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, गिरगाव, पायधुनी आणि ताडदेव परिसरातील रस्ते मिरवणुकांसाठी बंद राहतील. दादरमध्ये गर्दीचा उच्चांक असतो. त्यामुळे सावरकर मार्ग आणि टिळक उड्डाणपूल बंद राहील. जड वाहनांना बंदी असेल. भायखळा, भोईवाडा आणि वरळीतही महत्त्वाचे रस्ते आणि नो-पार्किंगचे निर्बंध असतील.
पोलिसांचा फौजफाटा
सुरक्षेसाठी तब्बल 24,000 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर तैनात असणार आहेत. सोबत रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ, फोर्स वन आणि अँटी-ड्रोन पथकांचा मुंबईवर खडा पहारा असणार आहे. त्यामुळे आता बाप्पाला निरोप देत असताना गणरायाच्या भक्तांनी पोलिसांनाही सहकार्य करावे. प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. सुरक्षितपणे आणि शिस्तीत लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.
