
Raj Thackeray And Uddhav Thackeray Rally: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याला शिवसेना उबाठा आणि मनसेकडून प्रखर विरोध झाला. त्यानंतर हा अध्यादेश महायुती सरकारने रद्द केले. त्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी शासनाच्या त्रिभाषा सूत्रावर जोरदार हल्ला चढवला. तसेच आमची मुले इंग्रजी माध्यमांत शिकली, त्या टीकेला अनेक उदाहरणांसह उत्तर दिले. भाषेचा कडवटणपणा हा शिक्षण कुठे घेतले त्यावर अवलंबून नसतो, तो तुमच्यात असावा लागतो. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे यांनी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतले. परंतु त्यांच्या मराठीवर कोणी शंका घेऊ शकतो का? असा सवाल राज ठाकरे यांनी टीकाकारांना विचारला.
ज्यांची मुले इंग्रजी माध्यमांत शिकली, त्यांना मराठीचा पुळका कसा आला? या टीकेला राज ठाकरे यांनी रोखठोक उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही मराठी माध्यमात शिकलो. त्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकले, असे ही लोक म्हणतात. परंतु बाळासाहेब ठाकरे अन् श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमांत शिकले. या दोघांवर मराठीबद्दल तुम्ही शंका घेऊ शकता का? बाळासाहेब ठाकरे यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढले. त्यांनी भाषेशी तडजोड केली नाही. भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातील मिशनरी शाळेत झाले. परंतु त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ शकता का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
राज ठाकरे यांनी दक्षिण भारताचे उदाहरण दिले. ते म्हणाले, दक्षिण भारतातील अनेक नेते आणि कलाकार इंग्रजी माध्यमात शिकले. त्यांना कधी कोणी विचारले नाही. आपल्या सैन्यात मराठा, शीख, जाट, पंजाब, पॅराशूट, गडवाल रायफल, बिहार, महार रेजिमेंट, जम्मू काश्मीर, गोरखा रायफल आहे. या सर्व रेजिमेंट शत्रू दिसल्यावर तूटून पडतात ना. मग भाषेचा प्रश्न येतो कुठे? असे राज ठाकरे यांनी म्हटले.
त्रिभाषा सूत्रावर हल्ला करताना राज ठाकरे म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात कोणती तिसरी भाषा आणणार आहे. हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्या मागास आहे. उलट जे राज्य हिंदी बोलत नाही, त्या राज्यांचा विकास झाला आहे. हिंदी भाषेबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. कोणतीही भाषा श्रेष्ठ असते. १२५ वर्षांपूर्वी संपूर्ण हिंद प्रातांवर मराठ्यांनी राज्य केले. परंतु आम्ही कोणावर हिंदी लादली का? हिंदी भाषा २०० वर्षांपूर्वींची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात नव्हती, असे राज ठाकरे यांनी म्हटले.