‘कैरी’मधल्या सायली संजीवच्या भूमिकेचं का होतंय कौतुक?
सायली संजीव आणि शशांक केतकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कैरी' हा चित्रपट 12 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सायलीच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे. त्यामागचं कारण काय, ते जाणून घ्या..

“प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो” असं नेहमीच ऐकायला मिळतं, पण असं स्त्रियांच्या बाबतीत फार कमी ऐकू येतं. आजही ही संख्या काही हवी तितकीशी वाढलेली पाहायला मिळत नाहीये. स्त्री स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिंमतीने काहीतरी करू पाहते असं चित्र हल्ली पाहायला मिळतं. जेव्हा त्या स्त्रीच्या पाठीशी कोणाचाच पाठिंबा नसतो अशा वेळेला ती न डगमगता, न कोलमडता अगदी स्वतः वरील विश्वासाच्या जोरावर मोठं पाऊल उचलते, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. असंच काहीसं घडलंय ‘कैरी’ चित्रपटातील कावेरीच्या आयुष्यात. गेल्या काही दिवसांपासून ‘कैरी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
‘कैरी’ चित्रपटाच्या गाण्यांनी, ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवलीच पण ‘कैरी’मधील एक असा भाग जो अर्थातच प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरणार आहे. चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे आणि ती कावेरी ही भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणं कावेरीच्या आयुष्यातून तिचा नवरा दूर जातो आणि त्याच्या शोधात परक्या देशात भाषा, संस्कृतीची जाण नसताना, कोणावर विश्वास ठेवावा हे माहीत नसतानाही ही कावेरी अगदी खंबीरपणे हा लढा लढते. आता हा लढा कावेरी कसा लढणार, हा लढा नेमका कोणता आहे हे सारं काही प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
पहा ट्रेलर
View this post on Instagram
या चित्रपटात अर्थातच स्त्रीच्या धैर्याची, भीतीच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी लढण्याची आणि सन्मानानं दृढनिश्चयाने लढण्याची ही कथा असल्याचे समोर येते. चित्रपट पाहताना रहस्याचे थर उलगडत जाणार असल्याचा अंदाज तुम्हाला एव्हाना आला असेल आणि हे रहस्य अत्यंत सुंदरपणे मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. अर्थात ‘कैरी’ चित्रपटातील महिला सक्षमीकरणासाठीचा हा प्रवास एका वेगळ्याच रूपात मांडला आहे. दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या नजरेतून महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल अर्थातच अभिमानास्पद आहे आणि सायलीने चित्रपटातील कावेरी ही भूमिका अत्यंत योग्यपणे हाताळत या भूमिकेला आणि महिलेच्या दृढनिश्चयाला न्याय मिळवून दिला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
