कोकणातील केमिस्ट्री, लग्नाचा थाट अन् अचानक प्रवासाला ब्रेक.. ‘कैरी’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
प्रेम लढायला शिकवतं..लढून जिंकायला शिकवतं.. तुमची परीक्षा घेतं कधी-कधी, पण प्रेम जगायला शिकवतं.. अशा टॅगलाइनसह 'कैरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये सायली संजीव, शशांक केतकर, सिद्धार्थ जाधव आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना? तर हिवाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘कैरी’ हा एक बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट असून येत्या 12 डिसेंबरला तो थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच उत्सुकता वाढवली होती. त्यानंतर आता ‘कैरी’चा ट्रेलर समोर आला आहे. अनेक टर्न ट्विस्ट असलेला हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढवत आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी ‘कैरी’ या रोमँटिक थ्रिलरचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार याची उत्सुकता ट्रेलरने वाढविली आहे.
ट्रेलरमधून समोर आलेलं कोकणातील नयनरम्य, हिरव्यागार वातावरणात झालेलं हे ‘कैरी’ चित्रपटाचं शूट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच शशांक आणि सायलीची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कोकणाच्या हिरव्यागार परिसरात त्यांचा रोमँटिक प्रवास खुलताना दिसत आहे. इतकंच नाही तर कोकणातील लग्नाचा थाटमाटही चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. अशातच अचाकन या दोघांच्या प्रवासाला ब्रेक लागतो. ट्रेलरमध्ये मध्येच आलेला हा टर्न चित्रपटाच्या कथेची उत्सुकता वाढवत आहे. नवरा हरवला म्हणून पत्नीची सुरु असलेली घालमेल ट्रेलरमध्ये दिसत असून हा ट्विस्ट चित्रपटात काय रंगत आणणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
पहा ट्रेलर-
View this post on Instagram
ट्रेलरमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी आहे. तर शूटिंगची ठिकाणंही नयनरम्य आहेत. विशेषतः कोकणातील शूट साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. ‘कैरी’ या चित्रपटाची निर्मिती ‘91 फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन ब्लॉकबस्टर व्यावसायिक अशा मराठी चित्रपटांनंतर ते ‘कैरी’ हा तिसरा चित्रपट घेऊन आले आहेत.
‘कैरी’चं लेखन स्वरा मोकाशी यांनी केलं आहे. या चित्रपटाला निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियुष यांनी सांभाळली. तर चित्रपटाचं छायांकन प्रदीप खानविलकर यांचं आहे आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. येत्या 12 डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
