‘फ्रेंडशिप फाईल’… हा लोकशाहीवरचा बलात्कारच… राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट, कुणाकुणावर हल्ला?
मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यात भाजपच्या ५०० कोटींच्या कथित डीलबद्दल व माध्यम दडपशाहीवर चर्चा आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली, याला 'लोकशाहीवरचा बलात्कार' म्हटले. मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक तपासणीचा निर्णय घेतल्यावरही राज यांनी 'वेळ मारून नेण्याचा प्रयत्न' म्हणत सरकारवर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप महाराष्ट्राला ऐकवून खळबळ उडवून दिली आहे. यात एकनाथ शिंदेंनी भाजपकडून 500 कोटी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच लव्ह जिहाद आणि नरेटिव्ह सेट करण्यापासून ते मीडियावर दबाव आणण्यापर्यंतचं प्लानिंग या क्लिपमधून दिसून येत आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण फॉरेन्सिक लॅबकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. ऑडिओ, व्हिडिओ क्लिप, खून आणि बलात्काराची प्रकरणं फॉरेन्सिकडे दिली जातात. हे प्रकरणही फॉरेन्सिककडे दिलं, ते बरोबर आहे. कारण हा लोकशाहीवरचा बलात्कारच आहे, असा हल्लाच राज ठाकरे यांनी चढवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करून हा हल्ला चढवला आहे. सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नवीन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
वेळ मारून न्यायचा प्रयत्न
ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं, असं राज यांनी म्हटलं आहे.
शहा काट’शाहाचं’ राजकारण
पुराव्यातील तथ्य तपासाच पण यात बोललं गेलं आहे. याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरंतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय, आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल, असा हल्लाच त्यांनी चढवला आहे.
