
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक क्षण पाहायला मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर अखेर आज एकत्र येणार आहेत. ठाकरे मनसे यांच्या अधिकृत युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केला. ते राज ठाकरेंच्या निवासस्थानावरुन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्ककडे रवाना झाले.
संजय राऊत यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याबद्दलची माहिती काल दिली होती. या ट्वीटनंतर सर्वांमध्ये एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज सकाळपासूनच वरळीतील ब्लू सी या हॉटेलमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदेचे जय्यत तयारी केली जात होती. या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे हे वांद्र्यातील मातोश्री या निवासस्थानावरुन राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी राज ठाकरेंच्या मातोश्रींनी राज आणि उद्धव यांचे एकत्र औक्षण केले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वात विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवतीर्थ ते स्मृतिस्थळ असा प्रवास एकाच गाडीतून केला. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. तर दुसऱ्या गाडीतून रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे स्मृतिस्थळाकडे रवाना झाल्या. ठाकरे कुटुंबियांना एकत्र पाहून शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. यावेळी शिवाजी पार्क परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
या युतीच्या बातमीने केवळ मुंबईतच नव्हे, तर उपराजधानी नागपुरातही उत्साहाचे वातावरण आहे. नागपुरातील मानकापूर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने आता महाराष्ट्रात नवा बदल घडेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युतीचा मुख्य भर मुंबई महानगरपालिकेवर असून जागावाटपाचा आकडाही जवळपास निश्चित झाला आहे. यानुसार शिवसेना ठाकरे गट १४५ ते १५० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६५ ते ७० जागा, इतर मित्रपक्ष १० ते १२ जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दादर, माहीम आणि शिवडी यांसारख्या मराठीबहुल मतदारसंघांतील पेच सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी समजूतदारपणाची भूमिका घेतल्याचे समजते.
आता स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दोन्ही नेते एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत युतीचे स्वरूप, आगामी निवडणुकांसाठीची रणनीती आणि जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता या ऐतिहासिक घोषणेकडे लागले आहे.