Rajyasabha Elections : शिवसेनेचे दोन्ही संजय उद्याच फॉर्म भरणार, कसला विश्वासघात? जागा सेनेचीच, राऊतांनी पुन्हा बजावलं

सुरूवातीपासूनच अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत. तर शिवसेनेकडून त्यांना लढण्याची ऑफरही होती. राजेंनी अपक्षच लढावं या भूमिकेत भाजप सुरूवातीपासूनच दिसून आली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे.

Rajyasabha Elections : शिवसेनेचे दोन्ही संजय उद्याच फॉर्म भरणार, कसला विश्वासघात? जागा सेनेचीच, राऊतांनी पुन्हा बजावलं
संजय राऊत, संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: TV9
| Updated on: May 25, 2022 | 3:41 PM

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून (Rajyasabha Elections) राजकारण शिगेला पोहोचले आहे. शिवसेनेकडून सध्या दोन उमेदवरांची घोषणा करण्यात आलीय. त्यात शिवसेनेची धडाडणारी तोफ संजय राऊत (Sanjay Raut) आणि कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांचं नाव आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र शिवसेना उमेदावार देण्यावर ठाम राहिल्याने राजेंच्या अडचणी वाढल्या आहेत. सुरूवातीपासूनच अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत. तर शिवसेनेकडून त्यांना लढण्याची ऑफरही होती. राजेंनी अपक्षच लढावं या भूमिकेत भाजप सुरूवातीपासूनच दिसून आली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करताना संजय राऊत म्हणाले,  संजय पवार व मी दोघे अर्ज दाखल करू, यावेळी मुख्यमंत्री स्वत: हजर राहतील. संभाजीराजेंना आम्ही 42 मते द्यायला तयार होतो. मात्र राजेंनी सेनेची ऑफर नाकारली. त्याठिकाणी दुसरा उमेदवार देणं यात कसला विश्वासघात? जागा सेनेची आहे, अपक्षांची नाही. आरोप करतायत त्यांनी नियम कायदा याचा अभ्यास करावा. बदनाम करण्याचा विडा उचलणाऱ्यांचं राजकारणात चांगले होणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला. तर संभाजीराजेंवरून सेनेवर टीका करणाऱ्या भाजपलाही त्यांही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने राजेंना मग 42 मते द्यावीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच माझा कोल्हापूरचा दौरा 27 पासून सुरू होईल, अशी माहितीही यावेळी राऊतांनी दिली.

भाजपच्या गोटातही हलचाली वाढल्या

दुसरीकडे भाजपच्या गोटातही हलचाली वाढल्या आहेत. भाजपचे माजी राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपने संधी दिल्यास पुन्हा राज्यसभेत जाण्याची डॅा. महात्मे यांनी फडणवीसांकडे व्यक्त इच्छा केली. आता पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणून डॉ. विकास महात्मे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भाजपकडून राज्यसभेत कोण जाणार? याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भाजपकडून सुरूवातीपासून दोन नावं चर्चेत आहेत. त्यात पहिलं नाव हे भाजप नेते विनोद तावडे आणि दुसरं नाव आहे महिला नेत्या विजया राहटकर यांचं. मात्र याही नावांवर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही. लवकरच भाजपच्या गोटातलेही चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.