Ramdas Athawale : दादागिरी खपवून घेणार नाही; एकनाथ शिंदेंचं समर्थन करत रामदास आठवले यांचा शिवसेनेला इशारा

शिवसेनेची गुंडागर्दी सुरू आहे. या आमदारांना घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवरावे. शिंदेंसोबतही आमदार आहेत, अशी आठवण रामदास आठवले यांनी करून दिली.

Ramdas Athawale : दादागिरी खपवून घेणार नाही; एकनाथ शिंदेंचं समर्थन करत रामदास आठवले यांचा शिवसेनेला इशारा
रामदास आठवले
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 25, 2022 | 1:53 PM

मुंबई : दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना करत असलेली दादागिरी योग्य नाही, असे वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले आहेत. दुसरीकडे अल्पमतात असलेले ठाकरे सरकार बहुमत कसे सिद्ध करणार, असा सवालही आठवले यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी मुंबईत भेट झाल्यानंतर रामदास आठवले बोलत होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वाद हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही, असे फडणवीस म्हणाल्याचे आठवले यांनी सांगितले. आम्ही आता वेट अँड वॉचमध्ये आहोत. एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हे सरकार अल्पमतात आहे. त्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही, असे आठवले म्हणाले.

‘व्हीप हाऊसमध्ये असतो, बाहेर नाही’

एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठा गट आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांनी आमच्याकडे बहुमत आहे, अशी भूमिका मांडणे अत्यंत अयोग्य आहे. बहुमत सिद्ध करण्याचा आपल्याला अधिकार आहे. जवळपास 44-45 आमदार तुमच्यापासून वेगळे आहेत. असे असताना तुमचे बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार या सरकारला नाही. 16 आमदारांना निलंबित करण्याची हालचाल सुरू आहे. मात्र त्यांना तुम्हाला निलंबित करता येणार नाहीत. 37 आमदार शिंदेंसोबत आहेत. तर व्हीप हा हाऊसमध्ये असतो, बाहेर नाही. त्यामुळे एखाद्या बैठकीला हजर झाले नाही, म्हणून पक्षातून काढता पण आमदारकी रद्द करा, अशी मागणी करण्याचा अधिकार उपसभापतींना नाही, असे आठवले म्हणाले.

‘माझ्या पक्षाचे लोक शिंदेंसोबत’

शिवसेनेची गुंडागर्दी सुरू आहे. या आमदारांना घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवरावे. शिंदेंसोबतही आमदार आहेत, अशी आठवण त्यांनी करून दिली. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. त्यांनी अशापद्धतीचा मोठा निर्णय घेतला. पोलिसांसमोर तोडफोड होत आहे. एकदा गेलेले आमदार तुमच्याकडे येतील, असे नाही. त्यामुळे दादागिरी करू नये. दरम्यान, माझ्या पक्षाचे लोक शिंदे यांच्यासोबत राहतील, असे आठवले म्हणाले.

शिवसेनेला काय इशारा?