
ऐन लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचं म्हटलं आहे. वायकरांना क्लीनचिट देताना, पोलिसांनी काय म्हटलंय तेही पाहुयात.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सी समरी रिपोर्ट सादर केला आहे. मुंबई महापालिकेनं गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. जोगेश्वरीत मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींचं फाईव्ह हॉटेल बांधल्याचा आरोप वायकरांवर होता. महापालिकेच्या 2 लाख वर्ग फुटाच्या जमिनीवर कब्जा केल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. आर्थिक गुन्हे शाखेनं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच वायकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ईडीनंही गुन्हा दाखल करुन 9 जानेवारीला वायकरांचं निवासस्थान, मातोश्री क्लब इथं ईडीनं छापेमारी केली होती. पण आता गैरसमजातून वायकरांवर गुन्हा दाखल झाल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.
भाजपच्या किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीचे डर्टी डझन म्हणत, धुवांधार आरोप केले. त्याच डर्टी डझन लिस्टमध्ये वायकरांचंही नाव होतं. आता आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिल्यावर काहीही बोलणार नाही, असं सोमय्या म्हणालेत.
आरोप करुन पक्षात घ्यायचं आणि नंतर क्लीन चिट द्यायची हा भाजपची पद्धत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. वडेट्टीवारांनी कमळछाप पावडर अशी टीका केली. तर अधिवेशन संपल्यावर त्याच कमळाच्या वॉशिंग मशिनमध्ये वडेट्टीवारही येतील, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
गेल्या 2 महिन्यात वायकरांच्या बाबतीत मोठ्या घटना घडल्या आहेत. ठाकरेंकडून शिंदे गटात येताच ते खासदार झाले. अर्थात त्या 47 मतांच्या विजयावरुन ठाकरे गटानं शंका घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता भूखंड घोटाळ्याच्या आरोपात क्लीन चिटही मिळाली. म्हणजेच गलती से मिस्टेक झाल्याचंच दाखवण्यात आलंय.