इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत 3 मोठे ठराव, 28 पक्षांची रणनीती ठरली

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाची रणनीती ठरवण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत 3 मोठे आणि महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत.

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत 3 मोठे ठराव, 28 पक्षांची रणनीती ठरली
INDIA Alliance
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2023 | 3:21 PM

मुंबई | 1 सप्टेंबर : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीतील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या बैठकीत तीन मोठे आणि महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे ठराव महत्त्वाचे आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आज महत्त्वाची रणनीती आखण्यात आली. या रणनीतीचा एक भाग म्हणून हे तीन ठराव करण्यात आले आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय. या मुद्द्यांबाबत इंडिया आघाडीचे नेते पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. पण त्याआधी त्यांनी तीन ठराव केल्याची माहिती समोर आली आहे.

‘ते’ तीन ठराव नेमके काय?

  • आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प करतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरात लवकर जागा वाटपाची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल
  • आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष देशातील वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रितपणे सार्वजनिक रॅली आयोजित करण्याचा संकल्प करतो.
  • आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये ‘जितेगा भारत’ या थीमसह आमच्या सर्व धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प करतो.

30 सप्टेंबरपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार?

इंडिया आघाडीच्या जागा वाटपात गिव्ह अॅण्ड टेक या आधारावर काही जागांची अदलाबदल होणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय याबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत इंडिया आघाडीकडून देशभरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त एकीने राहून एनडीला झटका द्यायचा, अशी इंडिया आघाडीची रणनीती आहे.

समन्वय समिती ठरली

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समन्वय समितीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा या समितीत समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे एम के स्टेलिन, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, जावेद अली खान, ललन सिंह, डी राजा आणि ओमर अब्दुला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांचा या समन्वय समितीत समावेश आहे.